राष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय !

भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता.

कंबोडियातील अकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले.

उत्तरेकडील खैबरखिंड आणि बोलण खिंडीतून हिंदुस्थानशी होणारा व्यापार थांबल्यावर पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा याने आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या समुद्रकिनार्‍यावर येण्याचा नवा मार्ग शोधून ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या युरोपीय सत्तांनी व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात येऊन जागोजागी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. पुढे त्या वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले, जलदुर्ग बांधले. स्वतंत्र नौदल उभारले आणि पुढे हिंदुस्थानात त्यांच्या सत्ताही स्थापन केल्या. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी धर्मप्रसाराचे आणि धर्मांतराचे कारस्थान चालवले. त्यासाठी प्रसंगी स्थानिक हिंदु प्रजेचा अतोनात छळ केला.

ज्याप्रमाणे उपरोल्लेखित सत्तांनी हा उद्योग चालवला होता, तोच प्रकार आफ्रिकेतून गुलाम म्हणून आलेल्या हबशी अथवा सिद्दी लोकांनी कोकण किनारपट्टीवर जंजिर्‍याच्या परिसरात त्यांची सत्ता स्थापून चालवला होता. या सर्व परकीय सागरी सत्तांकडे बळकट जलदुर्ग आणि शक्तीशाली नौदले होती. याउलट एकाही स्थानिक भारतीय सत्ताधिशाने या शत्रूंचा धोका ओळखून स्वतःच्या नौदलाच्या निर्मितीचा अथवा जलदुर्ग उभारण्याचा प्रयत्न केला नाही. संपूर्ण हिंदुस्थानचे बादशहा म्हणवून घेणार्‍या मोगल सत्ताधिशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता या युरोपीय सत्तांच्या अनुज्ञप्तीची शक्ती निमूटपणे मान्य करावी लागत होती. या पार्श्वुभूमीवर साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी स्वत:चे नौदल स्थापन करून कोकण किनारपट्टीवर अनेक अभेद्य जलदुर्गांची निर्मिती केली. जंजिरेकर सिद्दीबरोबरच पोर्तुगीज, इंग्रज, डच यांसारख्या आधुनिक युरोपीय सत्तांवर वेळोवेळी मात करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले आणि परकियांपासून देशाचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

लेखक – श्री. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहाससंशोधक

सिंधुदुर्ग उभारणीची सिद्धता !

ख्रिस्ताब्द १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणावर स्वारी करून कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. कल्याण बंदरात असलेल्या शत्रूच्या नावा कह्यात घेऊन हिंदवी स्वराज्याच्या नौदलाच्या स्थापनेचा शुभारंभ केला आणि तेथेच नव्या युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. युद्धनौका बांधण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पदरी अनेक पोर्तुगीज आणि इतर युरोपीय कारागीर नोकरीस ठेवले. त्यांच्या माहितीचा वापर करून घेत आधुनिक युरोपीय पद्धतीच्या जहाजांची निर्मिती चालू केली.

सभासद बखरकार लिहितो, राजियांनी जागा जागा डोंगर पाहून गड वसविले की, जेणेकरून दर्या जेर होईल आणि पाणियातील राजे जेर होतील, असे जाणून पाणियातील कित्येक डोंगर बांधून दर्यांमध्ये गड वसविले. गड आणि जहाजे मेळवून राजियांनी दर्यास पालण घातले. जोवर पाणियातील गड असतील, तोवर आपली नाव चालेल, असा विचार करून अगणित गड, जंजिरे भूमीवर आणि पाणियात वसविले. देश काबीज केला. गुराबा, तरांडी, तारव, गलबटे, शिबाडे अशी नाना जातीची जहाजे करून दोनशे जहाजांचा एक सुभा थाटीला. दर्या सारंग मुसलमान सुभेदार आणि मायनाईक म्हणोन भंडारी असे दोघे सुभेदार केले. त्यांनी शिदीची (सिद्दीची) जहाजे पाडाव केली. मोगलाई, फिरंगी, वळंदेज (डच), इंग्रज अशा सत्तावीस पादशहा पाणियात आहेत, त्यांची शहरे मारून जागा जागा युद्ध करीत समुद्रामध्ये एक लष्कर उभे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विशद केलेले जलदुर्गाचे महत्त्व

जंजिरेकर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा शिवरायांच्या महत्त्वाकांक्षेला मोठे आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवावी लागेल, हा विचार करून महाराजांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर एक बेलाग सागरी दुर्ग बांधायचा निर्णय घेतला. महाराजांच्या मनी विचार आला, चौर्यांऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. शिवरायांच्या अद्भुत बुद्धीला या स्थानाचे महत्त्व चमकून गेले. दर्याला पालाण घालायला ही जागा उत्तम आहे. त्यांनी ये बंदरी नूतन जंजिरा वसवावा, असा निश्चाय केला. भूमीपूजनासाठी योग्य मुहूर्त काढण्यासाठी मालवण गावचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना आमंत्रित केले गेले. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया, शके १५८६, म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ हा शुभमुहूर्त काढला. महाराजांच्या हस्ते शास्त्रीबुवांनी विधीवत भूमीपूजन केले. सुवर्णाचे श्रीफळ समुद्रार्पण करून सागराचे पूजन झाले. मग महाराजांच्याच हस्ते मुहूर्ताचा चिरा बसविला गेला. सुरतेच्या स्वारीत मिळालेली प्रचंड संपत्ती या शिवलंकेच्या अभेद्य निर्मितीसाठी खर्ची पडू लागली. निष्णात वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली हजारो पाथरवट, गवंडी, वडारी, लोहार, सुतार, शिल्पकार आणि मजूर अहोरात्र झटू लागले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये; म्हणून महाराजांनी २ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. महाराज जातीने लक्ष घालून आवश्यक रसद आणि अन्य साहित्य यांचा पुरवठा करत होते. प्रसंगी आवश्यक सूचनाही देत होते. महाराज एका पत्रात लिहितात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे. अवघे काम चखोट करणे. पाया योग्य घेणे. पायात ओतण्यासाठी शिसे धाडावयाची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजोन माल कह्यात घेणे. वाळू धुतलेलीच वापरणे, चुनकळी घाटावरोन उटण पाठवित आहो. रोजभरा हररोज देत जाणे. त्यास किमपी प्रश्न च न ठेवणे आणि सदैव सावध रहाणे.

या पत्रावरून महाराजांचा बारकावा आणि काटेकोरपणा दिसून येतो. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा, शके १५८९, म्हणजे २९ मार्च १६६७ या दिवशी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद सापडते. या वास्तुशांतीप्रसंगी महाराज स्वत: जातीने उपस्थित होते. त्यांच्या आगमनप्रसंगी तोफांचे आवाज करण्यात आले आणि साखर वाटली गेली. महाराजांनी सर्व कारागिरांना भरघोस पारितोषिके वाटली. विशेष कामगिरीबद्दल सोन्या-रुप्याची कडीदेखील वाटली.

स्वराज्याची सागरी राजधानी !

गडास सिंधुदुर्ग नाव प्रदान करून मोठा उत्सव साजरा केला. चित्रगुप्त बखरीत सिंधुदुर्गाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. चौर्‍याऐंशी बंदरी हा उत्तम जंजिरा. अठरा टोपीकरांच्या उरावरी शिवलंका अजिंक्य जागा उभारिली. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा, जैसे मंदिराचे मंडन. राज्याचा भूषणप्रद अलंकार, जणु पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले. स्वराज्याची सागरी राजधानी खडी केली, असे ते वर्णन आहे.

नंतरच्या काळात महाराजांनी राजकोट, सज्रेकोट, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग इत्यादी जलदुर्ग निर्माण केले; तर विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून अवघी कोकणपट्टीच नियंत्रणाखाली आणली. सिंधुदुर्ग चार किलोमीटर तटबंदीने सजविला असून बेचाळीस बुरुजांनी अभेद्य केला आहे. दहा मीटर उंचीची तटबंदी आणि वर-खाली जाण्यासाठी पंचेचाळीस जिने आहेत. पहारेकर्यांरसाठी चाळीस शौचकूप उभारले आहेत. किल्ल्याचा मुख्य द्वार गोमुखी रचनेने सुरक्षित केले आहे.

चुन्यात उमटवलेल्या महाराजांच्या हाता- पायांच्या ठशांवर उभारलेल्या घुमट्या आम्हांस भावुक करतात. शिवप्रभुंचे मूर्तीरूपातील साकारलेले एकमेव मंदिर येथेच आहे. सिंधुदुर्गाच्या भूमीपूजनास २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ३५०वर्षे पूर्ण होत आहेत.

संदर्भ : दैनिक तरुण भारत