व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

दक्षिण पूर्वेतील व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. व्हिएतनाम युद्धातील विजयानंतर तेथील राष्ट्रपतींनी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच आम्ही बलाढ्य अमेरिकेला नमवू शकलो ! असे उद्गार काढले होते.

व्हिएतनाम हा एक असा देश आहे की, त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली, त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत २० वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की, या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. केवळ काही घंण्टेच पुरे होतील; परंतु व्हिएतनामचे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले; कारण व्हिएतनामी योद्ध्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांची युद्धनीति अवलंबली होती. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले, तेव्हा ते म्हणाले, स्पष्टच आहे की, अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणे आपल्या देशाला शक्यच नव्हते; परंतु युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीति ठरवली आणि ती अतिशय ठामपणे राबवली परिणामी, काही दिवसांतच आमची सरशी होत आहे, असे दिसू लागले. यावर पत्रकारांनी विचारले, तो हिंदुस्थानी शूर राजा कोण होता ? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले, छत्रपती शिवाजी महाराज ! हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता, तर आज आम्ही जगावर राज्य केले असते. स्वतःच्या मृत्यूपूर्वी त्या राष्ट्रपतींनी अपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की, माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्त झाला ! त्यांच्या समाधीवर आजही हे वाक्य पाहायला मिळेल.

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामच्या महिला विदेशमंत्री हिंदुस्थानच्या भेटीवर आल्या होत्या. राजकीय शिष्टाचारानुसार त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधींची समाधी दाखवण्यात आली. ती पाहून झाल्यानंतर त्यांनी प्रश्‍न केला की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे ? त्यांचा हा प्रश्‍न ऐकूण हिंदुस्थानी राजशिष्टाचार अधिकारी अवाक् झाले. त्यांनी माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, तर महाराष्ट्रातील रायगड येथे आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जाऊन नतमस्तक व्हायचेय ! ज्यांच्या प्रेरणेने आम्हाला अमेरिकेसारख्या महाबलाढ्य राष्ट्राला पराभूत करता आले, त्यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्याविना मी माझ्या मायदेशी परत जाऊच शकत नाही. व्हिएतनामच्या या परराष्ट्रमंत्री रायगडला आल्या. त्यानी छत्रपती शिवाजी महाराजाच्यां समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी रायगडाची माती आपल्या मुठीत घेतली आणि ती मोठ्या भक्तीभावाने आपल्या बॅगेत सुरक्षित ठेवली. एवढेच नाहीतर तो माती भरला हात त्यांनी आपल्या कपाळावरून फिरवला. जणू काही त्यांनी त्या पवित्र मातीचा टिळाच अपल्या माथ्यावर लावला. त्यांची ती अवस्था पाहून विदेश मंत्रालयाचे अधिकारी केवळ आश्‍चर्यचकीतच झाले नाहीत, तर भारावूनही गेले. पत्रकारांनी आणि तेथे उपस्थित काही अधिकारी व्यक्तींनी त्यांना या संदर्भात प्रश्‍न केला, तेव्हा त्या उत्तरल्या, ही शूरवीरांच्या देशाची माती आहे. या मातीतच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा जन्माला आला होता. आता येथून गेल्यानंतर ही माती मी व्हिएतनामच्या मातीत मिसळून टाकीन. त्यामुळे आमच्या देशातही असे महान शूरवीर नायक जन्माला येतील. या घटनेला आता पुष्कळ वर्षे लोटली आहेत. नुकतीच सशक्त भारत नावाच्या एका नियतकालिकाच्या नोव्हेंबर मासाच्या अंकात या घटनेचा सविस्तर वृत्तांत छापून आला आहे.

दक्षिण पूर्वेतील एक इवलासा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. अमेरिका दुसर्‍या महायुद्धातील जागतीक विजयी राष्ट्र होते; पण व्हिएतनाममधील अमेरिकेच्या बलाढ्य सेनेला, त्यांच्यावर आक्रमण कधी, केव्हा, कुठे आणि कसे होते, हे कळायचेच नाही. झडप घालून करून व्हिएतनामी गोरिल्ले घनदाट जंगलात कुठे, कसे लपायचेे हे अमेरिकन सैन्याला कधीच कळले नाही. व्हिएतनामचे विभाजन करण्याचे अमेरिकेचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. खरेतर अमेरिकेकडे अतिशय संवेदनशील यंत्रे होती. ज्या भागात मानवी मूत्र असेल, त्या भागात या यंत्राचे दिवे लागायचे. व्हिएतनामी गोरिल्ले कुठे लपले आहेत, याचा ते शोध लावत आणि तिथेच नेमके बाँब टाकून गोरिल्ल्यांना मारायचे. तेव्हा पुन्हा छत्रपतींचा गनिमी कावा त्यांच्या उपयोगाला आला. या गोरिल्ल्यांनी मातीच्या मडक्यात मूत्र साठवून ती मडकी झाडाला लटकावणे चालू केले. परिणामी, अमेरिकन यंत्रांना प्रत्येक भागात गोरिल्लेच गोरिल्ले असल्याचे सिग्नल मिळू लागले. अमेरिकेने गोरिल्ल्यांना पकडण्यासाठी ढेकणांचा वापर केला. ढेकूण रक्ताच्या ओढीने माणसाच्या दिशेने जात असतो; पण गोरिल्ल्यांनी गॅसचा वापर करून ही सर्व ढेकणंच मारून टाकली. अशा असंख्य कारवाया अमेरिकेने डोके लढवून केल्या; पण व्हिएतनामी गोरिल्ले छत्रपतींच्या गनिमी काव्याआधारे त्यांना पुरून उरले. शेवटी अमेरिकेला कळून आले, आपला अनुबाँब या स्वातंत्र्याच्या वेडाने लढणार्‍या योद्ध्यांचे धैर्य तोडू शकत नाही. अंतिमतः अमेरिकेला माघार घ्यावी लागली. या गनिमी काव्यावर युद्ध पत्रकार श्री. मिलींद गाडगीळ यांनी मोठे रंजक पुस्तक लिहिले आहे. व्हिएतनामी गोरिल्ल्यांनी छत्रपतींची शिकवण आत्मसात केली आणि ते विजयी झाले. ही गोष्ट आपल्याला अत्यंत अभिमानास्पद आहे.