छत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा


प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अर्थ : प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते.

शिवमुद्रेचा रचयिता इतिहासाला ज्ञात नसणे

या मुद्रेवरील आशयगर्भ श्लोकाचा कर्ता कोण, रचविता कोण हे अंदाजाने काही सांगितले जाते. कोणी म्हणतात, शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनीच तो खोल आशयाचा श्लोक रचला असावा.

कोणाला वाटते समर्थ रामदासस्वामींचीच ती रचना असावी. रामचंद्रपंत अमात्यांनी, तर राजव्यवहार कोश लिहिला. शिवमुद्रेवरील आशय लिहिणे त्यांना काय कठीण ! कोणाला असाही तर्क लढवावासा वाटतो की, काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांचीच ही रचना असणार ! हे इतके विकल्प कसे सोडवायचे ? अर्थ एवढाच की, शिवमुद्रेचा रचविता इतिहासाला ज्ञात नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची ही मुद्रा अवघ्या विश्वाला कल्याणकारी वाटणे

शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल.

(गोमन्तक, ५.३.१९९९)