शिवरायांची युद्धनीती
महान सेनानी ! – औरंगजेब

‘प्रत्यक्ष औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ‘‘ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांचे बळ मात्र वाढतच होते.’’

हुशार आणि लष्करी डावपेचात निष्णात ! – गोव्याचा गव्हर्नर

गोव्याचा गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल अंतोनियो पाइश द सांद याने शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा एक अहवाल पोर्तुगालच्या सागरोत्तर मंडळाला पाठवला आहे. त्यात तो म्हणतो, शिवाजीराजे यांनी गोव्यापासून दमणपर्यंतच्या आमच्या सीमेला (सरहद्दीला) लागून असलेला प्रदेश घेतला असून सांप्रत ते मुघलांशी युद्धात गुंतलेले आहेत. हा हिंदुस्थानचा नवा ‘अ‍ॅटिला’ इतका हुशार आणि लष्करी डावपेचात इतका निष्णात आहे की, तो बचावाचे आणि चढाईचे युद्धही तितक्याच कुशलतेने खेळतो. तो मुघल प्रदेशात घोडदळ पाठवून प्रदेश जाळून बेचिराख करत आहे.

शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरिअस, हानिबॉल, अलेक्झांडर, ज्युलीयस सीझर यांच्याशी करता येईल ! – पोर्तुगीज आणि इंग्रज समकालिन (हे सर्व जण नावाजलेले सेनानी होते.)

युद्धप्रदेशाची पूर्ण माहिती असणे

असे विलक्षण काय होते या शिवाजी राजांमध्ये ? सर्वात पहिली गोष्ट, म्हणजे शिवाजीराजे ज्या प्रदेशात युद्ध खेळले त्या प्रदेशाची त्यांना पूर्ण माहिती होती. या दख्खनमधील डोंगर, नद्या, नाले कसे आहेत, दुर्ग, घाटवाटा कशा आहेत, याचा अभ्यास त्यांनी केलाच होता. एवढेच नव्हे, तर नकाशेही काढले होते.

सक्षम हेरखाते

माहिती असण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते महाराजांकडे होते. विश्वासराव नानाजी दिगे, बहिर्जी नाईक, सुंदरजी प्रभूजी अशी त्यांच्या हेरांची नावे मिळतात. शिवाजीराजांचे हेर बिहारमध्ये भेटल्याची नोंद समकालीन इंग्रज प्रवाशांनी केली आहे. खिस्ताब्द १६६४ या वर्षी पहिल्यांदा जेव्हा शिवाजीराजांनी सुरत लुटले, तेव्हा त्या शहराची बित्तंबातमी बहिर्जी नाईकने काढून आणली होती. ‘सुरत मारिलीयाने अगणित द्रव्य सापडेल’, असा सल्लाही त्याने महाराजांना दिला होता. सुरतेत किती पैसा दडलेला आहे, याची माहिती बहिर्जीने आधीच काढून आणली होती. त्यामुळे सुरतेच्या स्वारीत वेळ वाया गेला नाही.

बलवान ‘अर्थ’कारण आणि कोष

तिसरी गोष्ट म्हणजे कोष ! सैन्य राखायचे, म्हणजे संपत्ती हवी. प्रदेश संपादन करणे आणि त्याचे संवर्धन करणे, म्हणजे सैन्य हवे. ते सांभाळायचे म्हणजे द्रव्य हवे. त्यासाठी सुरतेसारख्या शहरातील गडगंज संपत्तीची लूट केली. चौथाई आणि गावखंडी यांसारखे करही शिवाजीराजांनी चालवले होते. गोव्यानजिकच्या बारदेशावर गावखंडी कर लावल्याची कागदपत्रांतून नोंद आहे. शिवाजीराजांचे हे ‘अर्थ’कारण फारच बलवान होते.

चपळ सैन्य

शिवाजीराजांचे सैन्य चपळ होते. हत्तीसारख्या धीम्यागतीच्या जनावरांस त्यात थारा नव्हता. स्त्रिया आणि बाजारबुणगे यांनाही सैन्यात बंदी होती. लुटीसाठी दुघोडी, तिघोडी स्वार मात्र असत. लष्कराच्या हालचाली चापल्य आणि वेग यांवर आधारलेल्या होत्या.

अकस्मात आक्रमण

अकस्मात आक्रमण (हल्ले) हा शिवाजीराजांच्या डावपेचांचा गाभाच होता. शाहिस्तेखानावरील विस्मयकारक छापा हा त्या आक्रमणातील कळसच होता. शिवाजीराजांच्या या आक्रमणानंतर ३ वर्षे पुण्यात असलेला खान आपली १ लक्षाची फौज घेऊन अवघ्या ३ दिवसांत गाशा गुंडाळून औरंगाबादला चालता झाला.

गनिमी कावा

शिवाजीराजांनी या प्रदेशात लढण्यासाठी आपली एक खास शैली शोधून काढली. यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात. ही शिवरायांची स्वराज्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ही कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध पद्धतीवर आधारलेली होती. ‘गनीम’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘लुटारू’ असा आहे. लुटारू जसे अकस्मात येतात आणि लूट घेऊन क्षणार्धात पळून जातात, तसेच शिवाजीराजेही करत असत. डेनिस किन्केडने म्हणूनच ‘द ग्रँड रिबेल’ असे म्हटले.

गनिमी काव्याची तत्त्वे : अकस्मात छापा, तोही आपल्याला सोयीस्कर अशा जागेवर, स्वत:ची न्यूनतम (कमीतकमी) हानी आणि हातात अधिकाधिक लूट किंवा प्रतिपक्षाची साधेल तेवढी अधिक हानी, ही या गनिमी काव्याची तत्त्वे होती. हे तंत्र जरी शिवाजीराजांनी जोपासले आणि मोठ्या प्रमाणावर वापरले, तरी त्यांचे प्रवर्तक शहाजीराजे होते.

मराठी अकलेचा एक अस्सल नमुना !

बहादूरखानाला फसवले ! : मराठी अकलेचा एक अस्सल नमुना महाराजांनी आलमगीराच्या दख्खनच्या सुभेदारास दाखवला. पुण्यापासून २४ कोसांवर भीमेच्या काठी, बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग हा किल्ला बांधून रहात होता. त्याच्यापाशी बादशहाला भेट (नजर) करण्यासाठी म्हणून आणलेले २०० अरबी घोडे आणि १ कोटी रुपयांचा खजिना असल्याची बातमी महाराजांना मिळाली. हेरांनी आपले काम व्यवस्थित पूर्ण केले. आता डावपेच, लढाई आणि लूट असा कार्यभाग राहिला होता. महाराजांनी डावपेच आखले. नऊ सहस्रांची फौज घेऊन महाराजांचा सेनाधुरंधर पेडगावच्या दिशेने निघाला. याचे नाव अज्ञात आहे; पण बहुधा हंबीरराव मोहिते असावा. याने फारच गंमत उडवून दिली. आपल्या फौजेच्या २ टोळ्या केल्या. २ सहस्रांची एक टोळी बहादूरगडावर धावून गेली. काय करावयाचे हे आधीच ठरलेले होते. मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला. जय्यत तयार झालेली मुघल फौज किल्ल्याबाहेर येऊन मराठ्यांच्या दिशेने निघाली. मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठी तुकडी पळत सुटली. हुलकावण्या मारीत त्या मराठी फौजेने मुघल फौजेला फार दूर नेले. बहादूरखान चिडून मराठी फौजेचा पाठलाग करत राहिला. खान फार दूरवर गेला आहे, याची बातमी हेरांनी आणल्यावर ७ सहस्रांची दुसरी मराठी टोळी बहादूरगडावर चालून आली. तेथे असलेल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही. पाचोळा कोठल्या कोठे उडाला आणि मराठ्यांनी मुघली छावणीची मोठी लूट केली. एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले. एवढी मिळकत (कमाई) झाल्यावर मराठ्यांनी मुघली छावणी पेटवून दिली. पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली. सर्व लूट घेऊन मराठे पसार झाले. शिवाजीराजांचा राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला.

इंग्रजी दर्यावदींना आश्चर्यकारकरीत्या फसवणार्‍या छोट्या चपळ मराठी बोटी ! : खिस्ताब्द (इ.स.) १६८९ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शिवाजीराजांनी मायनाक भंडारी याला अलिबाग नजीकच्या खांदेरी या बेटावर पाठवले. समुद्र उसळलेला असतांनाच मायनाकने खांदेरीवर किल्ला बांधावयास प्रारंभ केला. खांदेरी आणि उंदेरी ही बेटे अष्टगरातील थळ समोर समुद्रात आहेत. मुंबईच्या इंग्रजांनी कॅप्टन विल्यम मिनचिन याला हंटर आणि रिव्हेंज या दोन मोठ्या बोटी अन् गुराबा देऊन मायनाकला हाकलून देण्यास पाठवले. थळ येथील बंदरातून मराठी छोट्या बोटी रसद, सामानसुमान घेऊन बेटावर जात असत. हे साहाय्य बंद पाडण्याचे काम कॅप्टन मिनचिनला दिले होते. कॅ. अडर्टन, रिचर्ड केग्विन, फ्रांन्सिस थॉर्प, वेल्श, ब्रॅडबरी असे नामांकित दर्यावर्दी कॅ. मिनचिनच्या सोबत होते; पण किनार्‍याकडून समुद्राकडे वहाणारा वारा, भरती-ओहोटीचे कोष्टक, थळपासून खांदेरीपर्यंतचा उथळ किनारा या सगळ्यांची बित्तंबातमी इंग्रजांपेक्षा मराठ्यांना अधिक होती. मोठ्या शिडांच्या इंग्रज बोटी वार्‍यामुळे खडकावर आदळण्याची शक्यता असल्याने मोठ्या बोटींची उपयुक्तता न्यून झाली होती. छोट्या चपळ बोटी मात्र रसद घेऊन रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन बेटावर जात असत. त्या सकाळीच कॅ. मी मिनचिनला दिसत. त्याने मुंबईला पाठवलेल्या एका पत्रात लिहिले आहे, ‘या छोट्या चपळ मराठी बोटी आम्हाला आश्चर्यकारकरीत्या फसवतात. अशा बोटी इंग्रज आरमारात हव्यात.’ काय वाक्य आहे हे ! ‘ब्रिटानिया रुल्स द वेव्हज’ म्हणणारे इंग्रजी दर्यावर्दी असे म्हणतात, यातच मराठी सागरीसेनेचा विजय आहे. पुढे याच खांदेरीच्या परिसरात मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याने अकस्मात आक्रमण करून ‘डव्ह’ नावाची एक गुराब पकडली आणि त्यावरील इंग्रजांना सागरगडावर डांबले. या सर्व लढाईत इंग्रजांची मोठी हानी झाली.

आग्र्‍याच्या कैदेत असलेल्या शिवाजीराजांना घाबरणारा औरंगजेब ! : शिवाजीराजे आग्र्‍याच्या कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आग्र्‍याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.

अजिंक्य लढवय्या, सुष्टांचा मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता : ‘शिवाजी महाराज हे अद्वितीय सेनानी होते. सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची त्यांची मनीषा होती, असे तत्कालीन फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरेने लिहिले आहे. शिवाजी हे अजिंक्य लढवय्ये होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. ते सुष्टांचे मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता होते’, असे बर्नियर म्हणतो.

शिवाजी महाराजांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य असणे : रॉबर्ट आर्म याने म्हटले आहे, ‘उत्तम सेनापतीला आवश्यक असणारे सर्व गुण शिवाजी राजांमध्ये होते. शत्रूसंबंधी बातम्या मिळवण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. मोठी रक्कम ते यासाठी खर्च करत असत. कोणत्याही मोठ्या संकटाचा त्यांनी धैर्याने आणि युक्तीने सामना दिला. त्या काळातील सेनानींत ते सर्वश्रेष्ठ होते. हातात तलवार घेऊन आक्रमण करणारे शिवाजीराजे, ही त्यांच्या सैन्याची प्रेरणा होती. त्यांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते.

शिवाजी महाराजांनी मुघलांना पाठवलेले पत्र !

आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणेसुद्धा कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ? भलत्या खोट्या गोष्टी बादशहाकडे लिहून पाठवण्याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे पत्र मुघलांना पाठवणारे छ. शिवाजी महाराज ! : स्वत: शिवाजीराजांनी मुघलांना पाठवलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात शिवाजी महाराज म्हणतात, ‘आज ३ वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. बादशहा हुकूम फर्मावतात की, शिवाजीचे किल्ले तुम्ही काबीज करा. तुम्ही जबाब पाठवता की, आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणेसुद्धा कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ? भलत्या खोट्या गोष्टी बादशहाकडे लिहून पाठवण्याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? कल्याणी बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड आणि डोंगराळ आहे. नद्यानाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे माझे ६० किल्ले सिद्ध आहेत. पैकी काही समुद्रकिनार्‍यांवर आहेत. बिचारा अफजलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहाला का कळवत नाही ? अमीर उल उमरा शाहिस्तेखान या गगनचुंबी डोंगरात आणि पाताळात पोहोचणार्‍या खोर्‍यात ३ वर्षे सारखा खपत होता. ‘शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो’, असे बादशहास लिहून लिहून थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांसमोर आहे. आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही.’ किती सुंदर हे पत्र !

– निनाद बेडेकर (पुढारी, १७.४.१९९९, १९२१, शिवशक ३२५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात