आजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट नेतृत्व गुण !

१ अ. युद्धप्रसंगातील नियोजनकौशल्य ! : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास आणि नियोजन यांच्याविना एकही गोष्ट केली नाही. शाहिस्तेखानावर आक्रमण करण्यासाठी लाल महालात केवळ ५०जण गेले होते. तेव्हाही १,३५,००० विरुद्ध १२,००० हे प्रमाण होते. अफजलखानाच्या वेळी तर १० सहस्रविरुद्ध ३६ सहस्र हे प्रमाण होते. कोंडोजी फर्जदांचा पन्हाळ्याचा संग्राम असो कि शिवा काशीद अन्बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतला पराक्रम असो, हे सर्व प्रसंग त्यांचे उत्तम नियोजन सांगतात !

१ आ. माणसांची उत्तम पारख : छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरू आणि समशेर यांना समान समजले. त्यांना उत्तमपणे माणसांची पारख होती. पळी-पंचपात्री हातांत घेणारी माणसे (ब्राह्मण) परराष्ट्रखात्याचे वकील म्हणून उभे झाले. बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखे आदिलशाही सोडून महाराजांना येऊनमिळाले. त्यांनी महाराजांमध्ये काय पाहिले ? संभाजी कावजी कोंढाळकर, बहिर्जानाईक यांच्या सारखी पहिल्यांदा सामान्य वाटणारी माणसे नंतर असामान्य कर्तृत्व कशी गाजवून गेली ? असे कितीतरी मावळे,कितीतरी सरदार आहेत. त्यांना स्वराज्य लिहिता आले नसते; पण त्यांनी स्वराज्य निर्माण करून दाखवले.एखाद्या मोठ्या कार्यात स्वराज्याच्या विस्तारात सहस्रो माणसांपैकी केवळ ५-६ जण एवढेच काय ते महाराजांना सोडून गेले.

१ इ. शिस्त : नेताजी पालकर सांगितलेल्या दिवसापेक्षा एक दिवस विलंबाने आले, तर त्यांना महाराजांनी सरसेनापती पदावरून पदच्यूत केले. ४ पंतप्रधानांपैकी तीनही पंतप्रधान शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत महाराजांनी काढून टाकले.

१ ई. काटकसरी : महाराज आग्र्याहून सुखरूप सुटून आले. त्याच्या आनंदात गडावरील अधिकार्‍यांनी गडावरून तोफा डागल्या, जल्लोष केला. त्यावर छ. शिवाजी महाराजांनी तीव्र नापसंती दाखवली. ते रूक्षस्वभावाचे नव्हते; पण स्वराज्याने नुकतेच बाळसे धरले होते, तेव्हा ही उत्सवबाजी त्यांना मान्य नव्हती.महाराजांनी लगेच कुठल्या क्षणी किती दारू तोफांसाठी व्यय (खर्च) करायची, याचे नियम घालून दिले.त्याची कठोर अंमलबजावणीही केली.

२. आज देशाला लढाईची सिद्धता करणारे, तिचा अभ्यास आणि नियोजन यांचे दायित्व स्वतःवर घेणारे यांची आवश्यकता जास्त असणे

आताच्या काळास अनुसरून हे सांगावे वाटते की,राष्ट्रकार्यासाठी काम करत असलेल्या शिलेदारांना हा देव, देश, धर्म उच्च सिंहासनावर बसावा, असेमनोमन वाटते; पण त्यासाठी जो थोडा कंटाळवाणा अभ्यास आणि नियोजन लागते, ते टाळले जाते.रणशिंग फुंकल्यावर आम्ही सर्व जण लढाईत येतो, असे सांगणारे बरेच जण भेटतात; पण लढाईची सिद्धता करायची कोणी ? तलवारींना धार करायची कोणी ? सर्वांनाच पडदा उघडला जाईल, तेव्हा पडद्या समोर काम करायचे आहे; मात्र पडद्यामागील विभाग कोणी सांभाळायचे ? तो अभ्यास, ते नियोजन कोणीकरायचे ? त्याचे दायित्व स्वतःवर घेणार्‍यांची आज देशाला जास्त आवश्यकता आहे. झुंडीत उतरणार्‍यांचीनाही !!

– श्री. समर वि. दरेकर, पुणे (साप्ताहिक वङ्काधारी, वर्ष ५ वे अंक १८, ७ ते १३ जुलै २०११)