भूमीदोष

भूमीदोष

एकदा लक्ष्मण रामाला म्हणाला, ‘माझी सेवा नीट झाली नाही. मला अशी बुद्धी का झाली ? तेव्हा राम म्हणाला, भूमीदोषामुळे तसे होत आहे. एकदा शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी खूप तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले, ‘वर मागा’. राक्षस म्हणाले, ‘आम्हाला अमर करा’. शिव म्हणाले, ‘ते अशक्य आहे’. तेव्हा राक्षस म्हणाले, ‘मग आम्हीच एकमेकांना मारू, असा वर द्या’. शिवाने त्यांना तसा वर दिला. नंतर इंद्राने तिलोत्तमा या अप्सरेला पाठवले. तिच्यासाठी ते दोघे आपापसात युद्ध करून मेले. त्यांचे रक्त इथे सांडले; म्हणून तुझी मती भ्रमिष्ट झाली आहे’.

कर्मफलन्याय

१. भीष्मांनी मागील ७३ व्या जन्मात केलेल्या पापकर्मामुळे त्यांना शरशय्येवर पडावे लागणे : शरपंजरी असलेल्या भीष्माने कृष्णाला विचारले, “कृष्णा, मी ७२ जन्म पाठी (मागे) गेलो; परंतु त्या जन्मांत मी कोणतेही क्रूर कर्म केलेले दिसले नाही. असे आहे, तर मग मला बाणांच्या शय्येवर का पडावे लागले ?” त्यावर कृष्ण म्हणाला, “तू मागच्या ७३ व्या जन्मात एका नाकतोड्याला बाभळीच्या काट्याने टोचले होते. त्याचे हे फळ आहे.”

२. त्रेतायुगात रामाने वालीला मारल्यामुळे कृष्णावतारात पारध्याच्या रूपातील वालीने बाण मारल्यावर श्रीकृष्णाने देहत्याग करणे : सुग्रीवाने रामाला सांगितले, “वालीने माझ्या बायकोला पळवले आहे. वालीला वर आहे की, जो समोरून त्याच्याशी लढाई करील, त्याची अर्धी शक्ती त्याला मिळेल.” त्यामुळे रामाने झाडाच्या आडून वालीला बाण मारला. तेव्हा वालीने रामाला विचारले, “मी तुझे काय बिघडवले होते ?” राम म्हणाला, “माझ्या भक्तावर अत्याचार केलास; म्हणून मी तुला मारले. तरीही मी तुला मारले आहे; म्हणून मी पुढच्या जन्मी तुझ्या हातून मरेन.” कृष्णावतारात वाली पारधी झाला. त्याचा बाण लागल्यावर कृष्णाने देहत्याग केला.

– पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका)

Leave a Comment