अग्नीदेवाचा प्रसाद

राजाने एक ब्राह्मण अरण्यात बेलफळाचा यज्ञ करत असलेला पाहणे : विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करतांना दिसला. तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कुंडात टाकत असे. राजा कुतूहलाने ते बघत थोडावेळ उभा राहिला आणि नंतर निघून गेला.

राजाने काही दिवसांनी तोच ब्राह्मण यज्ञ करत असलेला पाहणे, राजाने चौकशी केल्यावर अग्निदेवाने प्रसन्न होऊन सोन्याचे बेलफळ द्यावे आणि इच्छित वर द्यावा, या कामनेने मी यज्ञ करत असल्याचे सांगणे; पण अजूनही अग्नीदेव प्रसन्न होत नसल्याचेही सांगणे : काही दिवसांनी राजा पुन्हा त्या बाजूला आला. अजूनही तो ब्राह्मण तिथेच होता. त्याचा बेलफळाचा होम अजूनही चालूच होता. राजाने त्याला विचारले, ‘‘हे ब्राह्मण आपण कोण ? आपण काय करत आहात ?’’

त्यावर ब्राह्मण म्हणाला, ‘‘माझं नाव नागशर्मा. मी बेलफळाचा होम करतो आहे. या होमाने अग्नीदेव प्रसन्न व्हावा, त्याने सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रकट व्हावे आणि इच्छित वर मला द्यावा; म्हणून मी हा होम करतोय. गेले कित्यक दिवस मी होम करतोय; पण अद्याप तरी मला अग्नीदेव प्रसन्न झाला नाही.’’

अग्नीदेवा, ‘आता जर तू प्रसन्न झाला नाहीस, तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन’, असे म्हणून राजाने बेलफळ अर्पण करताच अग्नीदेव प्रसन्न होणे, राजाची आणि ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करणे : राजा म्हणाला, ‘‘मी प्रयत्न करून बघू का ? मला मंत्र सांगा.’’ नागशर्माने राजाच्या हातात बेलफळ दिले आणि मंत्र सांगितला. राजाने मंत्र म्हणून बेलफळाचे हवन केले; पण काहीही लाभ झाला नाही.

नंतर राजाने आणखी एक बेलफळ घेतले आणि म्हणाला, ‘‘अग्नीदेवा, आता जर तू प्रसन्न झाला नाहीस, तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन.’’ राजाने मंत्र म्हणून बेलफळ यज्ञकुंडात टाकले आणि काय आश्‍चर्य ? प्रत्यक्ष अग्नीदेव हातात सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रकट झाले आणि म्हणाले, ‘तुझ्या धैर्याने मी संतुष्ट झालो आहे. सांग तुला काय हवं ?’

राजा म्हणाला, ‘या ब्राह्मणाची इच्छा पूर्ण कर.’ अग्नीने ब्राह्मणाला म्हटले, ‘ब्राह्मणा, तू धनवंत होशील. तुझी संपत्ती अक्षय राहील.’ ब्राह्मणाने अग्नीदेवाला विचारले, ‘मी इतके दिवस यज्ञ करतो आहे; पण मला तू का प्रसन्न झाला नाहीस ? राजाने एकच बेलफळाचे हवन करताच तू कसा प्रकट झालास ?’

राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नसल्याने अग्नीदेवाने त्यांना भरभरून देणे : राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते. अग्नीदेव म्हणाला, ‘तू यशवंत, कीर्तीवंत राजा होशील. तुझ्या राज्यात धन-धान्याची उणीव कधीच भासणार नाही. त्याप्रमाणे मी तुला आणखी एक वर देतो. जे अदृश्य रूपात घडत असेल, तेही तुला दिसेल.’

राजाने आणि नागशर्मा ब्राह्मणाने अग्नीदेवतेला वंदन केले आणि अग्नीदेव अंतर्धान पावले. राजा आपल्या नगराकडे आणि नागशर्मा त्याच्या घराकडे परतले.

राजाच्या दरबारात तांब्याचे मंत्राने चूर्ण टाकून सोने करणारा एक ब्राह्मण येणे, दरबारात हा प्रयोग असफल होणे; कारण ते चूर्ण सूक्ष्मरूपाने दरबारात असलेल्या यक्षाने झेलणे, हे राजाच्या लक्षात येणे, राजाने त्याचे हात धरणे आणि तांब्याचे सोने होणे : एक दिवस दरबार भरला असतांना दरबारात दत्तशर्मा नावाचा एक ब्राह्मण आला. तो म्हणाला, ‘‘मी असे एक चूर्ण शोधून काढले आहे, जे तांब्यावर टाकले असता त्याचे सोने होते. मी आपल्याला हे सिद्ध करून दाखवेन.’’ त्याप्रमाणे दरबारात तांब्याचे भांडे आणवले गेले. दत्तशर्माने काही मंत्र म्हणून त्याच्यावर चूर्ण टाकले; पण तांब्याचे भांडे काही सोन्याचे झाले नाही. दत्तशर्माने तीन वेळा प्रयत्न करून बघितला; पण तरीही तांब्याचे भांडे सोन्याचे झाले नाही.

दरबारी मंडळी म्हणाली, ‘‘महाराज, हा माणूस लबाड आहे. आपल्याला तो फसवून आपल्याकडून पैसे लुबाडायला आलाय. त्याला चांगली शिक्षा करा.’’

दत्तशर्मा म्हणाला, ‘‘महाराज, मी मुळीच खोटे बोलत नाही. माझ्या घरी अनेक वेळा प्रयोग करून पाहिल्यावरच मी आपल्याला दाखवण्यासाठी इथे आलोय. आज माझा प्रयोग फसला हे खरे; पण का ते मला कळत नाही.’’

दत्तशर्माचा प्रयोग का फसला होता, हे त्याला नाही, तरी राजाला बरोबर कळले होते. एक यक्ष तिथे अदृश्य रूपात उपस्थित होता. दत्तशर्माने मंत्र म्हणून चूर्ण टाकले की, तो ते वरच्यावर झेली. चूर्ण तांब्यापर्यत पोहोचतच नव्हते, तर ते सोन्याचे होणार कसे ? मग राजाने दत्तशर्माला सांगितले, ‘‘तू केवळ आणखी एकदाच तुझा प्रयोग कर.’’ त्याप्रमाणे दत्तशर्माने मंत्र म्हणताच चूर्ण झेलण्यासाठी यक्षाने पुढे केलेले हात राजाने धरले. अर्थातच चूर्ण तांब्याच्या भांड्यावर पडले आणि भांडे सोन्याचे झाले.

यक्षाने राजाची क्षमा मागणे, राजाने ब्राह्मणाचे कौतुक करून त्याला आपल्या दरबारी मानकरी म्हणून ठेऊन घेणे : इकडे राजाने हात धरल्यामुळे यक्षाला तेथून जाता येईना. त्याला दृष्यरूप धारण करावे लागले. तो दृष्य झाला. राजाने सांगितले, ‘‘हा वरच्यावर तू टाकलेले चूर्ण झेलत होता; म्हणून प्रथम तीन वेळा भांडे सोन्याचे झाले नाही.’’ यक्षाने राजाची आणि दत्तशर्माची क्षमा मागितली आणि तो पुन्हा अदृष्य होऊन निघून गेला. दरबारी मंडळींनी राजाचा आणि दत्तशर्माचा जयजयकार केला. राजाने दत्तशर्माचे कौतुक तर केलेच, त्याजबरोबर आपल्या दरबारात मानकरी म्हणून ठेऊनही घेतले. पुढे अनेक वर्षे राजाने राज्य केले. आपल्या प्रजेला सुखात, आनंदात ठेवले.

– साप्ताहिक जय हनुमान (२०.२.२०१६)

 

Leave a Comment