Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

सूचनासत्र आणि स्वभावदोष यांची निवड कशी करावी ?

         बालमित्रांनो, आता आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या रूपरेषेतील चौथे सूत्र ‘सूचनासत्र करणे’, हे आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया.

१. सूचनासत्र

         मुलांनो, स्वतःचे स्वभावदोष घालवण्यासाठी एका वेळी ३ स्वयंसूचना द्यायच्या असतात. या प्रक्रियेला ‘सूचनासत्र’ असे म्हणतात. स्वयंसूचना एकाग्रतेने आणि परिणामकारकपणे देता येणे, हा एकप्रकारे अभ्यासच आहे; म्हणून या प्रक्रियेला ‘अभ्याससत्र’ असेही म्हणतात. आरंभी कोणत्या स्वभावदोषांवर सूचना द्याव्यात, त्या सूचना केव्हा पालटाव्यात, दिवसात किती वेळा सूचना द्याव्यात इत्यादींचा विचार सूचनासत्रात होतो. सूचनासत्राचे स्वरूप पुढे स्पष्ट केले आहे. मुलांनो, स्वभावदोषांची निवड कशी करावी, याविषयी जाणून घेऊया.

२. स्वभावदोषांची निवड

२ अ. ‘स्वभावदोष सारणी’वरून तीव्र स्वभावदोष ओळखावेत : प्रत्येकात अनेक स्वभावदोष असतात. जे स्वभावदोष तीव्र आहेत, ते आधी दूर करणे महत्त्वाचे असते. तीव्र स्वभावदोष ‘स्वभावदोष सारणी’वरून ओळखावेत. समजा, एखाद्याच्या सारणीत ‘आळशीपणा’ या दोषासंबंधित अनेक प्रसंग असतील, तर त्याचा ‘आळशीपणा’ हा दोष तीव्र आहे, असे समजावे. तो मुलगा विविध प्रसंगांत वारंवार चिडत असेल, तर त्याचा ‘चिडचिडेपणा’ हा दोषही तीव्र आहे, असे समजावे.

२ आ. स्वभावदोष दूर करण्याचे प्राधान्य कसे ठरवावे ?

२ आ १. प्रथम प्राधान्य : तीव्र स्वभावदोषांपैकी ज्या दोषांमुळे इतरांना अधिक त्रास होऊ शकतो, असे दोष दूर करण्याला पहिले प्राधान्य द्यावे. समजा, एखाद्या मुलात ‘अव्यवस्थितपणा’ आणि ‘उद्धटपणे बोलणे’ हे दोन्ही दोष तीव्र आहेत. ‘अव्यवस्थितपणा’ या दोषामुळे त्या मुलाला इतरांपेक्षा स्वतःलाच अधिक त्रास होईल; परंतु ‘उद्धटपणे बोलणे’ या दोषामुळे दुसर्‍याचे मन दुखावले गेल्याने दुसर्‍याला त्रास होईल, तसेच त्या दोघांत दुरावाही निर्माण होईल. यासाठी त्या मुलाने ‘उद्धटपणे बोलणे’ हा दोष दूर करण्याला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे.

२ आ २. दुसरे प्राधान्य : तीव्र स्वभावदोषांपैकी ज्या दोषांमुळे स्वतःच्या मनाची शक्ती अधिक व्यय (खर्च) होते, असे दोष दूर करण्याला दुसरे प्राधान्य द्यावे. समजा, एखाद्या मुलात ‘अव्यवस्थितपणा’ आणि ‘निरर्थक विचार करत रहाणे’ हे दोन्ही दोष तीव्र आहेत. ‘अव्यवस्थितपणा’ या दोषामुळे एखादी वस्तू वेळेवर न सापडल्यास त्या वेळेपुरता मनःस्ताप होईल आणि मनाची शक्ती व्यय (खर्च) होईल; परंतु ‘निरर्थक विचार करत रहाणे’ या दोषामुळे मनाची शक्ती सारखी सारखी अकारण व्यय (खर्च) होत राहील. यासाठी त्या मुलाने ‘निरर्थक विचार करत रहाणे’ हा दोष दूर करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

२ आ ३. सूचनासत्रांची संख्या : मुलांनो, निवडलेल्या दोषांच्या तीव्रतेनुसार स्वयंसूचनांच्या सूचनासत्रांची संख्या निश्चित करावी. दिवसातून न्यूनतम (न्यूनतम) तीन आणि जास्तीतजास्त कितीही सूचनासत्रे करावीत.

         मुलांनो, सूचनासत्र करणे, हा स्वभावदोष-निर्मूलन करण्यासाठी रामबाण उपाय आहे. देवाच्या कृपेने आपल्याला तो समजला आहे. मग चला, या क्षणापासूनच आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी सिद्ध होऊया !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दोष घालवा आणि गुण जोपासा !’