अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया यासाठीची स्वयंसूचना पद्धत

         बालमित्रांनो, आता आपण स्वयंसूचना ‘पद्धत -२’ कशी बनवायची, हे जाणून घेऊया.

१. स्वयंसूचना पद्धत २ : योग्य प्रतिक्रिया

अ. स्वयंसूचना पद्धतीची उपयुक्तता

अनेक प्रसंगांत मुलाकडून / मुलीकडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होते किंवा त्याच्या / तिच्या मनात उमटते. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे येतात, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे येतात. सतत काही आठवडे स्वयंसूचना दिल्यामुळे मनात अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया येत राहिली, तर अंतर्मनातील दोषाचा संस्कार घटतो आणि गुणाचा संस्कार निर्माण होऊन स्वभावात चांगला पालट होतो. एक-दोन मिनिटांपेक्षा अल्प वेळ टिकणार्‍या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी ही स्वयंसूचना पद्धत वापरतात.

आ. स्वयंसूचनेत करायची वाक्यरचना

‘जेव्हा … प्रसंगात मी … कृती / विचार करत असेन, तेव्हा … अशी योग्य कृती / विचार करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात येईल आणि … अशी योग्य कृती / विचार मी करीन.’

इ. स्वयंसूचना पद्धतीमुळे मात करता येणारे स्वभावदोष

दुसर्‍यांवर टीका करणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, पश्चात्ताप न वाटणे, हट्टीपणा, संशयीपणा इत्यादी. स्वयंसूचना बनवण्यास शिकण्यासाठी आपण काही प्रसंगांचा अभ्यास करूया.

प्रसंग १ : कु. रामदास बराच वेळ बाहेर खेळत असल्याने त्याचा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे त्याचे बाबा म्हणाले, ‘‘रामदास, खेळ पुरे झाला, आता अभ्यास कर बघू.’’ रामदासला खेळायचे होते; अभ्यास नको होता. म्हणून बाबांनी त्याला अभ्यास करण्याची जाणीव करून दिल्यावर त्याला वाईट वाटले.

स्वभावदोष – वाईट वाटणे

स्वयंसूचना – बाबांनी मला खेळ थांबवून अभ्यास करायला सांगितल्यावर मला वाईट वाटत असेल, तेव्हा ‘मी अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, यासाठी बाबा मला खेळ थांबवायला सांगत आहेत’, हे माझ्या लक्षात येईल आणि मी लगेच अभ्यासाला बसेन.

प्रसंग २ : कु. समर्पणला शिक्षकांनी वर्गप्रमुख होण्यास सांगितले. तेव्हा ‘मला अभ्यास सांभाळून वर्गप्रमुख होणे शक्य नाही; कारण एवढ्या मुलांना सांभाळणे माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे’, अशी प्रतिक्रिया समर्पणच्या मनात आली आणि त्याने शिक्षकांना ‘मला वर्गप्रमुख होणे जमणार नाही’, असे सांगितले.

स्वभावदोष – आत्मविश्वासाचा अभाव

स्वयंसूचना – जेव्हा शिक्षक मला वर्गप्रमुख म्हणून दायित्व (जबाबदारी) घ्यायला सांगतील, तेव्हा ‘माझ्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होण्याची ही उत्तम संधी आहे’, हे मी लक्षात घेईन आणि शिक्षकांना होकार देईन.

प्रसंग ३ : बाहेर खेळत राहिल्याने ठरलेल्या वेळेपेक्षा घरी उशिरा पोहोचलेल्या कु. प्रेमानंदला त्याच्या बाबांनी ‘कुठे गेला होतास’, असे विचारले. तेव्हा त्याने बाबांना रागावून उत्तर दिले.

स्वभावदोष – राग येणे आणि उद्धटपणा

स्वयंसूचना – घरी उशिरा पोहोचल्यावर जेव्हा बाबांनी मला ‘कुठे गेला होतास’, असे विचारल्यावर मला राग येईल, तेव्हा ‘ते माझ्या भल्यासाठी आणि त्यांना माझी काळजी वाटत असल्याने विचारत आहेत’, हे माझ्या लक्षात येईल आणि मी त्यांना नम्रपणे ‘खेळत होतो’, असे उत्तर देईन.

प्रसंग ४ : कु. नित्यानंदला परीक्षेत अपेक्षित असे गुण न मिळाल्याने त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता, ‘माझी बुद्धीमत्ताच अल्प आहे. मी जीवनात कधी यश मिळवूच शकणार नाही; मग पुष्कळ अभ्यास करून तरी काय उपयोग आहे ?’

स्वभावदोष – न्यूनगंड निर्माण होणे

स्वयंसूचना – परीक्षेत अपेक्षित असे गुण न मिळाल्याने जेव्हा माझ्या मनात ‘मी जीवनात कधी यश मिळवूच शकणार नाही; मग पुष्कळ अभ्यास करून तरी काय उपयोग ?’, अशी न्यूनगंडाची भावना निर्माण होईल, तेव्हा ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे’, हे सुवचन आठवून मी पुन्हा उत्साहाने अभ्यासाला आरंभ करीन.

         मुलांनो, स्वयंसूचना देण्याच्या जोडीलाच मनाला योग्य दृष्टीकोन देऊन समजावताही येते. परीक्षेत अपयश आल्याने न्यूनगंड निर्माण झालेला विद्यार्थी असा विचार करू शकतो, ‘शास्त्रज्ञ विज्ञानातील नवेनवे शोध लावतात. त्या सर्वांना आरंभी अपयशच येते; परंतु त्याविषयी न्यूनगंड करून न घेता ते पुढे चिकाटीने संशोधन करतच रहातात. त्यामुळे शेवटी ते सफल होतात.

         मुलांनो, स्वयंसूचना देऊन मनाला योग्य दृष्टीकोन देऊया आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करूया !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’

Leave a Comment