अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीची स्वयंसूचना पद्धत

         बालमित्रांनो, स्वभावदोष जाण्यासाठी मनाला स्वयंसूचना द्याव्या लागतात, त्या बनवण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊया.

१. ‘स्वयंसूचना’ म्हणजे काय ?

         स्वतःकडून झालेली चुकीची कृती, मनात आलेला अयोग्य विचार आणि व्यक्त झालेली किंवा मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्यात पालट होऊन त्यांच्या ठिकाणी योग्य कृती होण्यासाठी किंवा योग्य प्रतिक्रिया निर्माण होण्यासाठी स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) जी योग्य सूचना द्यावी लागते, तिला ‘स्वयंसूचना’ असे म्हणतात.

         अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर स्वतःकडून घडलेल्या अयोग्य गोष्टीसंबंधी अंतर्मनाला (चित्ताला) योग्य गोष्ट करण्याचा उपाय सुचवणे, म्हणजे ‘स्वयंसूचना’ होय. मनाला पटलेला दृष्टीकोन प्रेमाने समजावणे, म्हणजे ‘स्वयंसूचना’. यामध्ये मुलगा / मुलगी बाह्यमनाने अंतर्मनाला आवश्यक त्या सूचना देतो / देते. मुलांनो, असे समजूया की, ‘आळस’ या दोषामुळे तुम्ही सकाळी उशिरा उठता आणि पुढे आवरायला उशीर होतो. त्यामुळे शाळा किंवा शिकवणीवर्ग यांना जाण्यास उशीर झाल्याने मनाची चिडचीड होते. हे टाळण्यासाठी ‘आळस’ हा दोष घालवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी ‘मी सकाळी गजर झाला की, लगेच उठेन किंवा आईने हाक मारली की, लगेच उठेन’, असे मनाला सतत सांगायला लागते. हे मनाला सतत सांगणे, यालाच ‘स्वयंसूचना’ म्हणतात. मुलांनो, स्वयंसूचना बनवण्याच्या काही पद्धती आहेत़ त्यामधील ‘स्वयंसूचना पद्धत १’ विषयी माहिती करून घेऊया़

२. स्वयंसूचना पद्धत १ : अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण

अ. स्वयंसूचना पद्धतीची उपयुक्तता

या पद्धतीनुसार दिलेल्या स्वयंसूचनेमुळे चुकीचे विचार, भावना आणि अयोग्य कृती यांची मुलाला / मुलीला जाणीव होते अन् त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे त्याला / तिला शक्य होते.

आ. स्वयंसूचनेत करायची वाक्यरचना

‘…. या स्वभावदोषामुळे जेव्हा माझ्या हातून … कृती घडत असेल / माझ्या मनात … विचार किंवा भावना येतील, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि … कृती करण्याचे / …. विचार करण्याचे … महत्त्व माझ्या लक्षात येऊन मी … कृती करीन / … विचार करीन.’

इ. स्वयंसूचना पद्धतीमुळे मात करता येणारे स्वभावदोष

या पद्धतीचा वापर करून पुढील स्वभावदोष आणि अयोग्य कृती दूर करता येतात – एकाग्रता नसणे, उतावीळपणा, धांदरटपणा, अव्यवस्थितपणा, वेळेचे पालन न करणे, आळशीपणा, अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, स्वार्थीपणा, निर्णयक्षमतेचा अभाव, नीतीने न वागणे, संशयीपणा, गर्विष्ठपणा, घमेंडखोरपणा, मनोराज्यात रमणे आदी स्वभावदोष. तसेच नखे कुरतडण्यासारख्या सवयी, तोतरे बोलणे, आठ वर्षे वयानंतरही अंथरुणात लघवी करणे इत्यादी अयोग्य सवयी. स्वयंसूचना बनवण्यास शिकण्यासाठी आपण काही प्रसंगांचा अभ्यास करूया.

प्रसंग १ : कु. गुरुदास गणिताचा अभ्यास करतांना दोन-दोन मिनिटांनी इकडे-तिकडे पहात होता.

स्वभावदोष – ‘एकाग्रतेचा अभाव’ हा वरकरणी दिसणारा स्वभावदोष, तर ‘अभ्यासाचे गांभीर्य नसणे’ हा मूळ स्वभावदोष. आरंभी एक-दोन आठवडे ‘एकाग्रतेचा अभाव’ या दोषावर स्वयंसूचना देऊन नंतर ‘अभ्यासाचे गांभीर्य नसणे’ या दोषावर स्वयंसूचना देण्याची आवश्यकता आहे.

स्वयंसूचना –

१. ‘एकाग्रतेचा अभाव’ या स्वभावदोषासाठी द्यायची स्वयंसूचना – गणिताचा अभ्यास करतांना जेव्हा मी दोन-दोन मिनिटांनी इकडे-तिकडे पहात असेन, तेव्हा ‘मी अभ्यास एकाग्रतेने केला, तरच तो माझ्या चांगला लक्षात राहील’, याची मला जाणीव होईल आणि मी अभ्यासावर लक्ष एकाग्र करीन.

२. ‘अभ्यासाचे गांभीर्य नसणे’ या स्वभावदोषासाठी द्यायची स्वयंसूचना – गणिताचा अभ्यास करतांना जेव्हा मी दोन-दोन मिनिटांनी इकडे-तिकडे पहात असेन, तेव्हा ‘मला गणित या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत’, याची मला जाणीव होईल आणि मी गणिताच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करीन.

प्रसंग २ : कु. अर्चनाने शाळेतून घरी आल्यावर दप्तर पलंगावर टाकले.

स्वभावदोष – अव्यवस्थितपणा

स्वयंसूचना – शाळेतून घरी आल्यावर जेव्हा मी दप्तर पलंगावर टाकत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल अन् ‘दप्तर ही विद्यादेवताच आहे’, असे समजून मी ते माझ्या अभ्यासाच्या पटलावर व्यवस्थित ठेवीन.

प्रसंग ३ : कु. देवीदास घरात नुसता बसला होता. तेव्हा आईने त्याला घराशेजारील दुकानातून स्वयंपाकासाठी मिरची-कोथिंबीर आणण्यास सांगितले. तेव्हा त्याने अभ्यासाचे कारण सांगून आईला नकार दिला.

स्वभावदोष – आळशीपणा

स्वयंसूचना – जेव्हा आईने मला दुकानातून स्वयंपाकासाठी मिरची-कोथिंबीर आणण्यास सांगितल्यावर मी त्या वस्तू आणून देण्यास आळस करत असेन, तेव्हा ‘आईला स्वयंपाक करण्यात अडचण येईल’, याची मला जाणीव होऊन मी मिरची-कोथिंबीर आणण्यासाठी लगेचच जाईन.

प्रसंग ४ : आईने घरी खाण्यासाठी कोणते पदार्थ केले असतील, याचा विचार कु. आरती शाळेच्या तासाला करत होती.

स्वभावदोष – निरर्थक विचार करणे

स्वयंसूचना – वर्ग चालू असतांना ‘घरी आईने खाण्यासाठी कोणते पदार्थ केले असतील’, याचा जेव्हा मी विचार करत असेन, तेव्हा ‘वर्गात नीट लक्ष दिल्यास शिकवल्या जाणार्‍या विषयाचा माझा अभ्यास चांगला होईल’, याची मला जाणीव होईल आणि मी लगेचच वर्गातील शिकवण्याकडे लक्ष देईन.

         मुलांनो, दिवसभरात मनात येणार्‍या विचारांपैकी ३० टक्के विचारच उपयोगी असतात, तर ७० टक्के विचार अनावश्यक म्हणजेच निरर्थक असतात. काही विचार व्यक्तींसंबंधी, तर काही प्रसंगांसंबंधी असतात. यामुळे मनाची शक्ती विनाकारण व्यय (खर्च) होते. असे निरर्थक विचार येत असल्यास त्या वेळी वाचन करावे. ते शक्य नसल्यास नामजप करावा.

प्रसंग ५ : शाळेतील मराठीच्या तासाला कु. प्रार्थना ‘शाळेच्या स्नेहसंमेलनात मी चांगली वेशभूषा आणि केशभूषा केली आहे, सर्व जण माझे कौतुक करत आहेत’ अशासारख्या विचारांत रमली होती.

स्वभावदोष – मनोराज्यात रमणे

स्वयंसूचना – मराठीचा तास चालू असतांना जेव्हा मी स्नेहसंमेलनाच्या विचारांमध्ये रमलेली असेन, तेव्हा ‘परीक्षेच्या दृष्टीने शिकवला जाणारा धडा महत्त्वाचा असून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी लगेच शिकवल्या जाणार्‍या धड्याकडे लक्ष देईन.

        बालमित्रांनो, स्वयंसूचना बनवणे जसे सोपे आहे, तसेच स्वभावदोष घालवणेसुद्धा सोपे आहे. त्यासाठी आपण आजपासूनच प्रयत्न करूया…!

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’

Leave a Comment