छ. शिवरायांसारखा आदर्श राजा आणणे,
हाच खरा ‘शिवराज्याभिषेक दिन !’


विद्यार्थीमित्रांनो, ज्येष्ठ शु. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११५या दिवशी ‘शिवराज्याभिषेक दिन’ असतो. आजच्या राज्यकर्त्यांची मानसिकता पाहिल्यावर शिवरायांसारख्या राजाचीच आपल्याला का आवश्यकता आहे, हे लक्षात येईल. शिवरायांसारख्या राजामुळेच राष्ट्र आणि धर्म यांचे, म्हणजेच पर्यायाने आपलेसुद्धा रक्षण होईल. मित्रांनो, आज आपण पहातो की, राज्यकर्ते कोट्यवधी रुपयांची राष्ट्रीय संपत्ती लुबाडत आहेत. आज भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन आणि अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेले राज्यकर्ते राज्य करत आहेत. असले दुर्गुणी राज्यकर्ते आपले आणि आपल्या राष्ट्राचे रक्षण करतील का ? त्यामुळेच त्यांची हकालपट्टी करून शिवरायांसारखे राज्यकर्ते आणण्याचा निश्चय करणे, हाच खरा शिवराज्यभिषेक दिन होय.

१. देव, देश आणि धर्म संकटात असतांना
छ. शिवरायांच्या रूपात हिंदूंना वाली मिळून प्रजेचे दैन्य दूर होणे

शिवरायांचा राज्यभिषेक होण्यापूर्वी आपल्या माता-भगिनी सुरक्षित नव्हत्या. स्त्रियांवर अनेक अत्याचार होत होते. त्यांना कोणी वालीही नव्हता. हिंदूंचे बळजोरीने धर्मांतरणही केले जाई, म्हणजे त्या काळातही आपले देव, देश, धर्म इत्यादी सर्व संकटात होते. हिंदूंना कोणीही वाली नव्हता. अशा काळात शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि लोकांवर आईसमान प्रेम करणारा, त्यांना सांभाळणारा राजा मिळाला. त्यामुळे त्या वेळची प्रजा सुखाने राहू लागली आणि आपल्या राजावर जीव ओवाळून टाकू लागली. आजही आपल्याला असेच वाटते ना की, छ. शिवरायांप्रमाणेच राजा असावा !

२. छ. शिवरायांचा स्फूर्तीदायी इतिहास
दडपून टाकण्यासाठी सध्याच्या राज्यकर्ते करत असलेले प्रयत्न

२ अ. शाळांमधून खोटा आणि विकृत इतिहास शिकवणे : एन.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमधून आमचे आदर्श राजे ‘शिवाजी महाराज हे लुटारू होते’ आणि लुटारू असलेले ‘आदर्श राज्यकर्ते होते’, असा खोटा इतिहास शिकवला जातो. अकबराने अनेक हिंदू स्त्रियांचे चारित्र्य लुटले, तरीही तो कसा आदर्श होता, हे बिंबवण्यासाठी पाठ्यपुस्तकातील पानेच्या पाने भरून वर्णन केले जाते आणि ज्यांना सार्‍या जगताने ‘आदर्श राजा’, असे म्हणून गौरवले, अशा छ. शिवरायांवर मात्र केवळ चार ओळी दिल्या जातात.

मित्रांनो, या राज्यकर्त्यांनी आमच्या पुस्तकातून शिवरायांचे आणि त्यांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाचे चित्रही काढून टाकले आहे.

२ आ. रायगडावर जेथे शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेथे जयंती साजरी करायलाही बंदी आणली जाते. तेव्हा मित्रांनो,खरा इतिहास दडपून टाकणारे सध्याचे राज्यकर्ते आपल्यावर कोणते सुसंस्कार करणार आहेत ?

३. सध्याच्या राज्यकर्त्यांचे सत्य स्वरूप

३ अ. बालवयापासून विषमतेचे बीज रोवणे :आपण शाळेत जातो, तेव्हा वर्गात विचारले जाते, ‘तुझी जात कोणती ? तुला सवलत मिळू शकेल; कारण तू अमुक एका विशिष्ट जातीचा आहेस, तसेच तुला अल्प गुण असले, तरी कुठेही प्रवेश मिळेल !’ म्हणजे शाळेतूनच आपल्या मनात विषमतेचे बीज पेरले जाते. असे बीज पेरणारे राज्यकर्ते आपल्याला नकोतच. प्रत्येक मुलाला त्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळायला हवा, मग तो कोणत्याही जातीचा असो. यानेच समाजात समानता आणि मुलांमध्ये संघभावना निर्माण होईल.

छ. शिवाजी महाराज आपल्या सैन्यात तरुणांना भरती करतांना तो कोणत्या जातीचा आहे, हे पहाण्याऐवजी त्या कामासाठी तो पात्र आहे का, याचा विचार करत. आपल्यालाही असाच राजा हवा, जो सर्वांना समानतेची वागणूक देतो आणि संघभावना जोपासून राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होणारी पिढी निर्माण करतो. अशा राज्यकर्त्यांनाच आम्हाला निवडून द्यायला हवे.

३ आ. मुलांचे अन्नपदार्थ आणि सुगंधी दूध यांत भेसळ करणे :खरेतर राजा आईप्रमाणे असायला हवा; पण या राज्यकर्त्यांना आमच्या जिवाचीही काळजी नाही. जे राज्यकर्ते विद्यार्थ्यांना दिलेले जेवण आणि दूध यांतही भ्रष्टाचार करतात, ते कधीतरी आपले रक्षण करतील का ? शक्यच नाही. अशा राज्यकर्त्यांचा निषेध करणे, हाच खरा शिवराज्याभिषेक साजरा करणे होय.

३ इ. जनतेला उपाशी ठेवून धान्यापासून दारू बनवण्याला प्रोत्साहन देणे :आज आपल्या देशात ४० टक्के जनता उपाशी आहे. जनतेला खायला अन्न नसल्याने तिची उपासमार होत असतांना धान्यापासून दारू बनवली जाते. अशा अत्यंत स्वार्थाने लडबडलेल्या राज्यकर्त्यांना माणूस तरी कसे म्हणायचे ? यांना राज्य करण्याचा काय अधिकार आहे ? आजच्या दिवशी त्यांना हटवण्याचा निश्चय करणे, हाच खरा ‘शिव राज्याभिषेक दिन’ होईल. मग असा निश्चय करणार ना ?

३ ई. पाश्चात्त्य धर्तीच्या चित्रपट आणि विज्ञापने यांमुळे मुलांवर कुसंस्कार होतील, याचा विचार न करणे : आज आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी कोणते माध्यम उपलब्ध आहे ? सर्व चित्रपटांत मारामार्‍या, हत्या आणि दरोडे घालणे, असेच सर्व दाखवले जाते. यातून आमच्यावर कोणते संस्कार होणार आहेत ? चित्रपट आणि विज्ञापने (जाहिराती) यांत अंगावर तोकडे कपडे घातलेल्या मुली अन् मुले दाखवतात. यातून आमच्यावर कोणते संस्कार करायचे आहेत कि आम्हाला बिघडवायचेच आहे ? आम्हाला असे राज्यकर्तेच नकोत, जे आमच्यावर राष्ट्र, धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संस्कार करत नाहीत.

३ उ. मुलांवर परकीय भाषा लादून त्यांना स्वभाषेपासून वंचित ठेवण्यात येणे : तुम्ही आम्हाला लहानपणापासून परकीय भाषेतच का शिक्षण देता ? ज्याची मातृभाषा चांगली, तो इतर भाषाही सहजेपणे अवगत करू शकतो. या परकीय भाषेमुळे आमच्या मनावर ताण येतो आणि न्यूनगंड येऊन निराशाही येते. आम्हाला मातृभाषेतूनच शिक्षण द्या. आम्हाला आमच्या देवतांची माहिती, तसेच जीवनाची सर्व मूल्ये शिकवणारे रामायण-महाभारत यांचेही शिक्षण हवे आहे. भावी पिढी सक्षम व्हावी, असा विचार न करणारे हे राज्यकर्ते आमच्या समस्यांचा कोणताही विचारच करत नाहीत.

विद्यार्थीमित्रांनो, असे राज्यकर्ते आपल्याला आवडतात का ? नाही ना ? आपल्याला छ. शिवरायांसारखे राजे हवेत ना ? मग आपण श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया, ‘हे श्रीकृष्णा, आम्हाला शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते लवकरात लवकर मिळू देत आणि आदर्श राज्याची पहाट पहाता येऊ दे !’ हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.