Menu Close

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

दादर (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

मुंबई – ‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. या संदर्भातील सत्य घटना मांडून हा भाग पुनर्प्रसारित करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. ‘सोनी लिव’च्या विरोधात मुंबईत दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर ३ जानेवारी या दिवशी करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते.

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली.

‘सोनी लिव’वरील आक्षेपार्ह भागामुळे ट्विटरवर ‘#BoycottSonyTV’ हा ‘हॅशटॅग’ २ दिवस चर्चेत होता. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांनी ‘सोनी लिव’च्या विरोधात घोषणा देत त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

गुन्हेगारांचे धर्म पालटून हिंदूंना गुन्हेगार दाखवण्याचा प्रयत्न ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

या वेळी सतीश कोचरेकर म्हणाले, ‘‘सोनी लिव’वरील ‘क्राईम पॅट्रोल २.०’ च्या २१२ क्रमांकाच्या भागामध्ये धर्मांध आफताब याची व्यक्तीरेखा ‘मिहिर’ या हिंदु नावाने, तर श्रद्धा वालकर या दलित युवतीची व्यक्तीरेखा ‘ॲना फर्नांडिस’ या ख्रिस्ती नावाने दाखवली. हे अत्यंत संतापजनक आहे. ‘सोनी लिव’च्या निर्मात्यांनी ३५ तुकडे करणार्‍या आफताबला पाठीशी घालत हिंदु युवकाने ही निर्घृण हत्या केल्याचे दाखवले. या गुन्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘लव्ह जिहाद’चे सूत्र दाबण्याचा प्रयत्न केला. याचा हिंदूंनी तीव्र विरोध केला. त्यानंतर ‘सोनी लिव’ने ‘ही घटना आफताब-श्रद्धा वालकर यांच्या विषयीची नसून वर्ष २०११ ची आहे. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर खेद आहे’, असे सांगून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसली. खरेतर श्रद्धा वालकर हत्येच्या प्रकरणी ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वस्तूस्थिती मांडून हिंदु युवतींना खर्‍या अर्थाने सतर्क करण्याची संधी या कार्यक्रमातून साधता आली असती; मात्र गुन्हेगारांचे धर्म पालटून हिंदूंना गुन्हेगार दाखवण्याचा प्रयत्न हेतूतः केला गेला.’’

‘लव्ह जिहाद’ लपवणार्‍या ‘सोनी लिव’चा आंदोलनात धिक्कार !

या आंदोलनात मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, वज्रदल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय चिंदरकर, भगवा गार्डचे अध्यक्ष श्री. अवधूत पेडणेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक हे सहभागी झाले होते. यासह सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

तर आंदोलन अधिक तीव्र करू ! – हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

‘सोनी लिव्ह’ने खेद व्यक्त करतांना दिलेल्या स्पष्टीकरणात ‘हा भाग काल्पनिक असून तो वर्ष २०११ मध्ये घडलेल्या काही घटनांवर आधारित आहे’, असे म्हटले आहे. एकीकडे या कार्यक्रमापूर्वी सूचना सांगितली जाते की, हा भाग सत्य घटनेवर आधारित आहे; पण मग क्षमा मागतांना तोच भाग ‘काल्पनिक’ कसा होतो ? जर तो ‘काल्पनिक’ आहे, तर ‘वर्ष २०११ च्या घटनेवर आधारित आहे’, असे कसे असू शकेल ? यातून ‘सोनी लिव’ खोटारडेपणा करत आहे. वर्ष २०११ चे हे कोणते प्रकरण आहे, ज्यावर हा भाग आधारित होता ?, त्याचा तपशील २ दिवसांत घोषित करावा, अन्यथा ‘सोनी लिव’ने पुन्हा हिंदु समाजाची दिशाभूल केली, यासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करू’, अशी चेतावणी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *