Menu Close

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : येथील आजरा रस्त्यावरील सूर्या उपाहारगृहासमोर १३ मे या दिवशी सकाळी ९.३० वाजता श्रीराम आणि श्री हनुमान या हिंदु देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍या दोन बहुरूप्यांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी आणि सतीश हळदकर यांनी दम देऊन त्यांचा पोशाख उतरवण्यास भाग पाडले. (हिंदु देवतांचे विडंबन रोखणारे हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी आणि सतीश हळदकर यांचे अभिनंदन ! असे विडंबनाचे प्रकार सर्व हिंदुत्वनिष्ठांनी रोखणे हे त्यांचे कर्तव्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हे दोघे बहुरूपी दसरा चौकात हिंदूंकडूनच भीक मागत होते. हा प्रकार हिंदुत्वनिष्ठ श्री. महेश दळवी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या बहुरूप्यांकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. त्यानंतर श्री. दळवी यांनी हिंदुत्वनिष्ठ श्री. सतीश हळदकर यांना भ्रमणभाष करून बोलावून घेतले. त्यानंतर या दोन हिंदुत्वनिष्ठांनी त्या बहुरूप्यांना श्रीराम आणि श्री हनुमान देवतांचे विडंबन कशा प्रकारे होत आहे, हे सांगून त्यांचे प्रबोधन केले. या वेळी जमलेल्या लोकांना हा सर्व प्रकार कळाल्यानंतर त्यांनी श्री. दळवी आणि श्री. हळदकर यांचे कौतुक केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *