Menu Close

भारताचा चुकीचा नकाशा प्रसारित केल्यावरून ग्लासगो (स्कॉटलंड) येथील उपाहारगृहाकडून क्षमायाचना

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक , हिंदू जनजागृती समिती)

ग्लासगो (स्कॉटलंड) – येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० पदके जिंकणार्‍या भारतीय मुष्टीपटूंच्या संघाच्या सन्मानासाठी ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ या उपाहारगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भारतीय महिला मुष्टीपटू लव्हलिना बोरगोहेन हिने उपाहारगृहाच्या परिसरात लावलेल्या आणि नॅपकीनवर (हात-तोंड पुसण्याचा कागदी रूमाल) छापलेल्या भारताच्या चुकीच्या नकाशावर आक्षेप घेतला. या नकाशात काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला होता, तर ईशान्य भारत दाखवण्यातच आला नव्हता. या आक्षेपानंतर उपाहारगृहाच्या व्यवस्थापनाने चूक मान्य केली. व्यवस्थापनाने क्षमा मागत नकाशा पालटण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ‘भारतीय बॉक्सिंग फेडरेशन’चे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, उपाहारगृहाच्या मालकांशी कोणताही वाद झाला नाही. नकाशात एक चूक होती, जी मी आणि लव्हलिनाने त्यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी चूक मान्य करून लवकरच ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.


२ ऑगस्ट

ग्लासगो (स्कॉटलंड) येथील भारतीय उपाहारगृहामध्ये नॅपकीनवर भारताचा चुकीचा नकाशा छापला !

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नकाशावरून वाद

  • भारतीय महिला मुष्टीपटू (बॉक्सर) लव्हलिनाने केला विरोध

भारतीय उपाहारगृहामध्ये नॅपकीनवर भारताचा चुकीचा नकाशा (डावीकडे) व भारतीय महिला मुष्टीपटू (बॉक्सर) लव्हलिना (उजवीकडे)

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक , हिंदू जनजागृती समिती)

ग्लासगो (स्कॉटलंड) – येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (कॉमनवेल्थ गेम्स) मध्ये एका भारतीय उपाहारगृहामध्ये नॅपकीनवर भारताचा नकाशा आणि तोही चुकीचा छापण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देण्यात आलेल्या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशात ईशान्येकडील राज्ये दाखवण्यात आली नव्हती. यावर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या आणि भारतीय मुष्टीपटू (बॉक्सर) लव्हलिना बोरगोहेन यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. लव्हलिना यांनी स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.

भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा ! – लव्हलिना

आसामची रहिवासी असलेल्या लव्हलिना यांनी नॅपकिनवर छापलेला नकाशा पहाताच त्या म्हणाल्या की, नॅपकिनवर बनवलेल्या आपल्या नकाशात ईशान्य भाग दाखवण्यात आलेला नाही. बाहेरही जो नकाशा लावला आहे, त्यातही आपला ईशान्य भाग नाही. हे पाहून मला अतिशय वाईट वाटले. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीनेच दाखवला गेला पाहिजे.

भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनीही या नकाशावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, नॅपकिनवर केवळ ईशान्य भारतच नाही, तर जम्मू-काश्मीरचेही अपूर्ण चित्रण करण्यात आहे. केवळ ईशान्य भारतच नाही, तर यात काश्मीरही पूर्ण नाही. चुकीचा नकाशा असलेले सर्व नॅपकिन्स तातडीने हटवले जावेत आणि त्यांच्या जागी भारताची संपूर्ण भौगोलिक सीमा योग्य प्रकारे दाखवणार्‍या नकाशाचा वापर केला जावा.

उपाहारगृहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही

ग्लासगो येथील ‘मिस्टर सिंग्स इंडिया – द होम ऑफ करी’ हे शहरातील प्रसिद्ध भारतीय उपाहारगृहांपैकी एक आहे. गेल्या ३ दशकांपासून हे उपाहारगृह चालू आहे. हा वाद समोर आल्यानंतरही उपाहारगृहाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसारित करण्यात आलेले नाही.

Latest News