Menu Close

आमोणा (गोवा) येथे ७ दिवसीय ‘हर घर योद्धा’ शिबिर उत्साहात संपन्न!

आमोणा (सांखळी) – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री अमृतेश्वर मंडप, आमोणा येथे ‘हर घर योद्धा’ नावाचे ७ दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले. यामध्ये एकूण १६ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. या शिबिराच्या सांगता समारंभाला श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्री. अच्युत गावस तसेच आमोणा ग्रामपंचायतीच्या पंच सदस्या सौ. दिया विजय सावंत यांची विशेष उपस्थिती होती. ‘सध्याच्या काळात स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे’, या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी कु. जतीन इझांकांत म्हतो याने केले. प्रशिक्षक श्री. स्मितल नेवगी यांनी प्रास्ताविक सादर करताना शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षित शिबिरार्थी युवक-युवतींनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर काही प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच उपस्थित काही पालकांनीही आपले विचार मांडले.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री. अर्जुन खरात यांनी मार्गदर्शन केले. हिंदू जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर यांनी समितीचे कार्य तसेच समाजात हिंदूंवर होत असलेल्या आघातांबद्दल माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पुढे प्रत्येक शुक्रवारी हा वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Latest News