-
हिंदुत्वनिष्ठ अमित भोसले आणि विक्रम घुंगरवाला यांची मागणी
-
पोलीस संथगतीने अन्वेषण करत असल्याचा आरोप

पुणे – हिंदु धर्मातील कीर्तन भक्तीचा आधार घेऊन हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे आमीष दाखवणार्या बिशप (धर्मोपदेशक) पंकज देवनूर याला पोलिसांनी तातडीने अटक करावी. त्याच्या पारपत्र कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. तसेच कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ श्री. अमित राजू भोसले आणि श्री. विक्रम घुंगरवाला यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी अधिवक्ता श्री. अशिष सोनवणे आणि सिताराम सोळंकी उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ नुसार नोंदवलेला राज्यातील पहिला गुन्हा आहे. पोलीस अत्यंत संथगतीने अन्वेषण करत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. शहरातील गुरुवार पेठेतील ‘पवित्र नाम देवालय’ (चर्च) येथे ७ ऑगस्ट या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदु धर्माची परंपरा असलेल्या आणि भक्ती परंपरेचा, नवविधाभक्तीतील कीर्तनाचा ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी जाणीवपूर्वक वापर केला गेल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
ब्रिटीश नागरिकत्व असलेला पंकज देवनूर हा ‘ओ.सी.आय.’ दर्जा असलेला नागरिक आहे. त्यांनी ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट’चे (आप्रवासन आणि परदेशी कायदा) उल्लंघन केले आहे. अशा नागरिकांना भारतात धार्मिक प्रचार, धर्मांतराचा प्रयत्न किंवा धार्मिक व्यासपिठांवर प्रचारकी भाषणे करण्यास बंदी असतांनाही देवनूर हे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. चर्चच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने चर्चमध्ये आयोजित केलेल्या कीर्तनात हिंदु धर्मातील कीर्तन, अभंग, भजन, भारूड, पोवाडा, गोंधळ, माऊली, पारंपरिक वाद्य आणि परिचित भक्तीरचनांचा ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी जाणीवपूर्वक वापर करण्यात आल्याचाही आरोप श्री. अमित भोसले आणि श्री. घुंगरवाला यांनी केला.







