
भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संकल्पासह ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ हा कार्यक्रम येथे नुकताच पार पडला. सलग ११ वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यंदाच्या कार्यक्रमात ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, तसेच विविध जिल्ह्यांतील कार्यकर्ते आणि सामाजिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी ‘अखिल भारतीय संत समिती’चे मध्यप्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी अनिलानंदजी महाराज, प्रसिद्ध तत्त्वचिंतक श्री. रामेश्वर मिश्र, हिंदु महासभेचे मध्यप्रदेश अध्यक्ष श्री. जीतेंद्र सिंह ठाकूर, ‘धर्मरक्षक’चे संस्थापक श्री. विनोद यादव आदी हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थित शेकडो तरुणांना मार्गदर्शन केले.

या वेळी राष्ट्र, धर्म, सामाजिक सलोखा आणि हिंदु समाजाची एकता यांसारख्या विषयांवर, तसेच ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, अतिक्रमणे, घुसखोरी आणि इतर सामाजिक सूत्रांवर चर्चा अन् विचारमंथन करण्यात आले.
श्री. विनोद यादव म्हणाले की, गेल्या ११ वर्षांपासून ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ हे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र आणून राष्ट्र अन् समाज यांच्याशी संबंधित सूत्रांवर चर्चा करण्याचे एक व्यासपीठ बनले आहे. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या संकल्पाने प्रेरित होऊन हे वैचारिक मंथन अविरतपणे चालू राहील, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सर्व पाहुणे, संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानण्यात आले; तसेच राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या हितासाठी कार्य करत रहाण्याचा संकल्प करण्यात आला.







