३१९ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण – १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यात विशेष ‘क्रांती गाथा’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन क्रांतीकारकांच्या दैदीप्यमान इतिहासाची माहिती जाणून घेतली.

या प्रदर्शनात श्री राजाराम राघोजीराव शिंदे माध्यमिक विद्यालय, ओवळी; सुमन विद्यालय, टेरव; ‘न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती); कळंबस्ते भागशाळा आणि विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल गुरुकुल, शिरळ या शाळांमधील एकूण ३१९ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकारकांनी दिलेले महान योगदान आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली देशसेवा या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. यातील अनेक अपरिचित आणि अज्ञात क्रांतीकारकांची माहिती विद्यार्थ्यांना नव्याने समजली. ही स्फूर्तीदायक माहिती वाचतांना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि कुतूहल पहावयास मिळाले. प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे अभिप्राय नोंदवून क्रांतीकारकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

विद्याभारती आणि भारतीय शिक्षा संकुल गुरुकुल, शिरळ येथे विश्व हिंदु परिषदेचे श्री. उदय चितळे आणि श्री. कुलकर्णीसर यांनी क्रांती गाथा प्रदर्शनाला भेट देऊन कार्याचे कौतुक केले. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य करत आहात, ते स्फूर्तीदायक आणि उत्साहवर्धक आहे आजच्या तरुण पिढीला क्रांतीकारकांची माहिती समजणे आवश्यक आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा !
अभिप्राय :
१. कुमारी सुषमा राजू गौतम आणि एक जण – क्रांतीकारकांनी देशासाठी जे योगदान दिले आहे, त्याबद्दल आम्हाला आमच्या देशाचा अभिमान वाटतो.
२. कुमारी वेदिका दीपक वायकर आणि अन्य दोन जण – आम्हाला चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, हरिहर आणि बुक्कराय, मंगल पांडे अन् वासुदेव बळवंत फडके यांची नवीन माहिती मिळाली. यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.
३. काही विद्यार्थ्यांचे अभिप्राय – या प्रदर्शनातून क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी कसा कसा लढा दिला ? ते आम्हाला समजले.








