Menu Close

बंट्वाळ (कर्नाटक) : एस्.डी.पी.आय कडून हिंदु जनजागृती समितीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला विरोध

  •  गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र’या संकल्पनेवर विचार मांडणे हे देशद्रोही कृत्य ! – एस्.डी.पी.आय

  • दोषींविरुद्ध बंट्वाळ पोलिसांत तक्रार दाखल

बंट्वाळ (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी येथील गीतांजली कल्याण मंडपामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा  करण्यात आला. या महोत्सवाच्या विरोधात ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे नेते अश्रफ तलपाडी याने खोटे, निराधार आणि प्रक्षोभक आरोप केले. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या फलकांचा आधार घेऊन व्यासपूजा आणि रामराज्यावरील धार्मिक प्रवचन यांचा समावेश असलेल्या पवित्र गुरुपौर्णिमा महोत्सवाला ‘देशद्रोही कार्यक्रम’ ठरवण्याचा त्याने प्रयत्न केला. समितीने याचा तीव्र निषेध केला आहे. समितीवर निराधार आरोप करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीने बंट्वाळ शहर पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली आहे.

१. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून धर्मजागृती, राष्ट्रजागृती आणि सांस्कृतिक जागृतीचे कार्यक्रम राबवत आहे.

२. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. धर्म, संस्कृती आणि ‘हिंदु राष्ट्र्र्र’ या संकल्पनांवर शांततापूर्ण मार्गाने विचार मांडणे हे कोणतेही अवैध कृत्य नाही. असे असतांनाही एका धार्मिक कार्यक्रमाला जाणीवपूर्वक ‘देशद्रोही’ ठरवणे आणि समितीची प्रतिमा मलीन होईल असा अपप्रचार करणे, हे अत्यंत गंभीर अन् निंदनीय कृत्य आहे.

३. खोटे आणि प्रक्षोभक आरोप करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी अन् कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

४. या जोडीला गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रचारासाठी फलक लावण्याची सेवा करणार्‍या धर्मप्रेमी ज्योतिषी श्री. अनिल पंडित यांच्या छायाचित्राचा अयोग्य वापर करून सामाजिक माध्यमावर अपमानास्पद आणि प्रक्षोभक संदेश पसरवण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. या कृत्याचाही हिंदु संघटनांनी निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बंट्वाळ शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या स्वतंत्र तक्रारीत करण्यात आली आहे.

५. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक शेट्टी, हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सुकुमार शेट्टी, श्री. शेखर कोट्टारी, ज्योतिषी श्री. अनिल पंडित, श्री. सुरेश राय इत्यादी उपस्थित होते.

Latest News