अपघातग्रस्त व्यक्तीसाठी ‘देवदूत’ म्हणून काम करता येईल, असे हे प्रथमोपचार प्रशिक्षण ! – प्रा. स्नेहल कुलकर्णी, उपप्राचार्या (कनिष्ठ महविद्यालय)

चिपळूण – अपघातात प्राणांतिक वेदनेने व्यक्ती कोसळते. तेव्हा देवदूत बनून जीव कसा वाचवावा ?, याचे अमूल्य ज्ञान या ‘प्रथमोपचार क्रॅश कोर्स’ मधून देण्यात आले. हे मौल्यवान कार्य आहे. माणसाचा जीव वाचवण्याचे काम प्रथमोपचार शिकलेली व्यक्ती करू शकते. या क्रॅश कोर्सचे प्रशिक्षण सर्वांना विनामूल्य दिले. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे आभार ! यातून मानवतेचे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडणार आहे, तुम्ही विद्यार्थी या क्षेत्रात ‘करियर’सुद्धा करू शकता. पुन्हा अन्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या प्रथमोपचार क्रॅश कोर्सचे नियोजन करू, असे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. डी.बी.जे. महाविद्यालयात ८ दिवसाच्या प्रथमोपचार प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समयी त्या बोलत होत्या.
युवा प्रथमोपचार क्रॅश कोर्स अभियानाचा उद्देश म्हणजे युवा पिढीला प्रथमोपचाराचे ज्ञान देणे, तसेच आपद्प्रसंगी प्रथमोपचाराच्या अनुषंगाने त्यांची पूर्वसिद्धता करून घेणे. या अंतर्गत रुग्णांची नाडी आणि श्वास पडताळणी, प्राथमिक विकाराचे निदान, हृदय विकाराचा झटका येणे, cols म्हणजे छातीदाबन, आकडी येणे, घोटा मुरगळणे, जखमेवर ड्रेसिंग, log roll पद्धती, रुग्णाला सुरक्षित ठिकाणी कसे वाहून न्यावे, असे अनेकविध प्रसंगी प्रथमोपचार करून रुग्णाला साहाय्य करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या सोबतच आपत्काल आणि युद्धप्रसंगी पूर्वसिद्धता काय करावी ? याचीही माहिती देण्यात आली.
फिजिओथेरेपीस्ट डॉ. (सौ.) शीतल माने, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी हे वर्ग घेतले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. श्वेता सालेकर, सौ. प्रिया अष्टेकर यांनी साहाय्य केले. वर्ग ११ वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. प्रशिक्षणाच्या सांगता समयी समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी ‘संभाव्य आपत्काळात प्रथमोपचाराचे महत्त्व’ याविषयी माहिती दिली.
या उपक्रमाला महाविद्यालयाने, उपप्राचार्या प्रा. स्नेहल कुलकर्णी, प्रा. पालशेतकर, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी चांगले सहकार्य केले.
अभिप्राय
प्रा. अविनाश पालशेतकर, एन्.एस्.एस्. कार्यक्रम अधिकारी, डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण : रुग्णाला वाचवण्यासाठी तत्परतेने साहाय्य करण्याचा जो सुवर्णकाळ असतो, त्यात नेमकेपणाने काय करायचे ? याचे प्रशिक्षण येथे दिले गेले. स्ट्रेचर, बँडेज, ड्रेसिंग कसे करायचे ? याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाविद्यालयाच्या वतीने आभार !
विशेष
१. महाविद्यालयात अन्य वर्गासाठीही असेच प्रथमोपचार क्रॅश कोर्स अभियानाचे नियोजन करण्यात येणार आहे .
२. गुणवत्ता वाढण्यासाठी आणि सराव होण्यासाठी आठवड्यातन १ दिवस १ घंटा प्रशिक्षणवर्ग व्हावा, अशी काही विद्यार्थिनींनी मागणी केली आहे, त्यानुसार वर्ग घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
३. उपस्थित विद्यार्थ्यांनी या वर्गात घेतल्या जाणार्या प्रायोगिक भागामध्ये स्वतः प्रात्यक्षिके करून पाहिली.







