Menu Close

कोल्हापूर : संत बाळूमामा मंदिरातील ६० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी रागिणी खडके पसार

देवस्थानच्या तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके

कोल्हापूर – श्रीक्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यातील ५५ लाख रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणी देवस्थानच्या तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच संशयित रागिणी खडके या पसार झाल्या आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण आता आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले आहे. या पथकाने मंदिरात जाऊन आजी-माजी विश्वस्तांकडून काही माहिती घेतली.

धर्मादाय आयुक्त शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत देवस्थान समितीच्या तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि काही मध्यस्थ यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून देवस्थानची, तसेच भाविकांची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संत बाळूमामा मंदिर हे ‘मंदिर ट्रस्ट ॲक्ट’ अंतर्गत कह्यात घ्यावे ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘या मंदिरात अनेक गैरव्यवहार चालू आहेत. केवळ रुग्णाईत असलेल्या मेंढ्यांचीच विक्री करता येते, असे असतांना प्रकृती चांगली असलेल्या मेंढ्यांची विक्री करण्यात येत आहे. मंदिरात घोटाळे करणार्‍यांमुळे ‘धर्मा’ची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे एकूणच देवस्थानावर नियंत्रण रहाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांप्रमाणे संत बाळूमामा देवस्थान हे ‘मंदिर ट्रस्ट ॲक्ट’ अंतर्गत शासनाने कह्यात घ्यावे.’’

राज्यातील ज्या ज्या मंदिरांचे आजपर्यंत सरकारीकरण झाले आहे, तेथे मोठे घोटाळे, अनियमितता, भ्रष्टाचारच झाल्याचे वारंवार समोर आले आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांची वारंवार पायमल्ली होते. त्यामुळे मंदिरांचे सरकारीकरण होण्यापेक्षा ते भक्तांकडेच राहिलेले अधिक संयुक्तिक ठरेल ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

Read more on Free Hindu Temples

Latest News