Menu Close

मदुराई (तमिळनाडू) येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची ६० कोटी रुपयांची भूमी हडपली

१९ लोकांविरुद्ध गुन्हा नोंद

मदुराई (तमिळनाडू) – येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराशी संबंधित एका धर्मादाय संस्थेची १.७९ एकर भूमी हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. या भूमीची किंमत अनुमाने ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी १९ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी भूमीच्या बनावट हस्तांतरण, नोंदणी आणि गहाण व्यवहारांद्वारे भूमी हडपली. ही कारवाई मंदिराचे संयुक्त आयुक्त आणि कार्यकारी अधिकारी सेल्लादुरई, तसेच भ्रष्टाचारविरोधी संस्था ‘अरापोर इयक्कम’ यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे.

तहसीलदारावर जमीन हडपल्याचा आरोप

या प्रकरणात आरोप आहे की, २४ जून २०१६ या दिवशी तत्कालीन मदुराई उत्तर तहसीलदार अनबझगन यांनी सरकारी नोंदीतून मंदिराच्या मालकीची नोंद काढून टाकली. त्यांनी अवैधपणे भूमीचा पट्टा ९ लोकांच्या नावावर हस्तांतरित केला. महसूल विभागीय अधिकार्‍याने तहसीलदाराचा आदेश रहित केला. भूमी मंदिर न्यासाची मालमत्ता असल्याचे सांगत पट्टा पुन्हा मंदिराच्या नावावर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठातही खटला चालू आहे. या खंडपिठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून गहाणखत सिद्ध केले !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करूनही १६ एप्रिल २०२० या दिवशी थूथुकुडी जिल्ह्यातील मुराप्पनडु उपनिबंधक कार्यालयात तत्कालीन उपनिबंधक अनंतरामन् यांच्या साहाय्याने जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी (एखाद्या व्यक्तीला आपल्या वतीने विविध कायदेशीर, आर्थिक किंवा प्रशासकीय कामे करण्याचा अधिकार देणारा कायदेशीर दस्तऐवज) नोंदणीकृत करण्यात आली, असा आरोप आहे. या आधारावर १९ जुलै २०२१ या दिवशी डिंडीगुल जिल्ह्यातील वडा मदुराई उपनिबंधक कार्यालयात तत्कालीन उपनिबंधक प्रशांत संथान करुप्पन यांच्या माध्यमातून गहाणखतही नोंदणीकृत करून घेण्यात आले. आरोपींनी कायदेशीर निर्बंधांचे उल्लंघन करून बनावट पट्टा हस्तांतरण आणि गहाण व्यवहाराद्वारे मंदिराच्या भूमीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला.

हिंदूंच्या मंदिरांची भूमी हडपण्याला मंदिरांचे सरकारीकरण कारणीभूत आहे. जोपर्यंत देशातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणर नाहीत ! – संपादक, हिंदू जनजागृति समिति

Read more on Free Hindu Temples

Latest News