संस्कार, संस्कृत भाषा आणि सनातन हिंदु संस्कृती यांचे पुनरुज्जीवन ही काळाची आवश्यकता ! – सदाशिव ढवळेगुरुजी, सहमंत्री, ‘संस्कृत भारती’

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी – पुढे येणार्या युद्धकाळात आपले, समाजाचे आणि भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्कार, संस्कृत भाषा अन् सनातन हिंदु संस्कृती यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन श्री. सदाशिव ढवळेगुरुजी यांनी केले. येथील ‘श्री भानुदास प्रतिष्ठान’मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय ‘हिंदु धर्मसंस्कार शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने उपस्थित होत्या.

श्री. सदाशिव ढवळेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘जगभर सध्या युद्धकाळ चालू असून शत्रूची शक्ती, कमकुवत स्थाने आणि बलस्थाने ओळखणे महत्त्वाचे आहे. आपल्याला शक्तीच्या बळावर लढत असतांना चातुर्य आणि युक्तीनेसुद्धा बलाढ्य शत्रूला नष्ट करणे हे काळानुसार आवश्यक ठरते. यातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, याचे सतत भान राखणे आवश्यक ठरते.’’ या प्रसंगी सौ. रेखाताई बोडस, कु. सविता खेराडकर, कु. उज्ज्वला खेराडकर यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नृसिंहवाडी येथील ‘श्री वासुदेवानंद सरस्वती गोशाळे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय शिरटीकर, ‘कलागंधर्व प्रतिष्ठान’चे संचालक आणि ‘ब्राह्मण सभा नृसिंहवाडी’चे सचिव श्री. बाळासाहेब आलासकर, शिरोळ येथील श्री. रवींद्र महात्मे दांपत्य यांसह युवा उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. सांगली आणि कोल्हापूर येथे युवक अन् युवती यांना एकत्र करून ‘संस्कृत भाषा वर्ग’ आयोजित करू. या माध्यमातून सर्वांना संस्कृत भाषा बोलण्यासाठी उद्युक्त करूया, असे आवाहन श्री. ढवळेगुरुजी यांनी उपस्थित युवाशक्तीला केले.
२. कपाळावर टिळा लावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.








