‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या सहकार्याने ‘हिंदु जनजागृती समिती’चा उपक्रम

सातारा – देशाचे आधारस्तंभ असणारी राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा पिढी निर्माण व्हावी, यासाठी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘हिंदु धर्मसंस्कार शिबिर’ पार पडले. येथील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या सहकार्याने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ ते २७ मे या कालावधीमध्ये निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यासह सांगली, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यातील ७० हून अधिक युवक आणि युवती या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘श्री समर्थ सेवा मंडळा’चे विनायकबुवा रामदासी, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आणि सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिरास प्रारंभ झाला.
गडप्रदक्षिणा आणि रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा

शिबिरार्थींना श्रीक्षेत्र सज्जनगड येथील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व कळावे, यांसाठी ‘श्री समर्थ सेवा मंडळा’चे सुहासबुवा रामदासी यांनी गडप्रदक्षिणा घडवली. या वेळी शिबिरार्थींना कल्याण उडी स्मारक, ब्रह्मपिसास्मारक, धाब्याचा मारुति, मंगळाईदेवी मंदिर, शेजघर, समाधी मंदिर यांविषयी माहिती दिली. गडप्रदक्षिणा झाल्यानंतर शिबिरार्थी राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. या वेळी सर्व शिबिरार्थींनी समर्थांच्या साक्षीने प्रभु श्री रामरायासमोर रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.
‘श्री समर्थ सेवा मंडळा’ने उपस्थित शिबिरार्थींच्या निवास आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली.
मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन
शिबिरात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या श्रीमती विद्या पुरोहित, हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर, सौ. भक्ती डाफळे, सौ. रूपा महाडीक, श्री. मंगेश निकम यांच्यासह अन्य मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, हिंदु देवी-देवता, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, प्राचीन भारताचे आध्यात्मिक महत्त्व, हिंदू वीरांगना तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयांवर अनमोल मार्गदर्शन केले.
स्वसंरक्षण प्रशिक्षण, क्रांतिकारक आणि धर्मशिक्षणाच्या फलकांद्वारे धर्मसंस्कार
शिबिरार्थी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव क्षीरसागर यांनी बलोपासनेच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे दिले. शिबिरस्थळी क्रांतिकारकांचे जीवनदर्शन, तसेच हिंदु धर्मशिक्षणाचे प्रबोधनात्मक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनांना शिबिरार्थी आणि गडावर आलेल्या भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या सहकार्याविषयी आभार
‘श्री समर्थ सेवा मंडळा’ने उपस्थित शिबिरार्थींच्या निवास आणि भोजन महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली. समर्थभक्त पू. योगेशबुवा रामदासी, सुभाषबुवा रामदासी, विनायकबुवा रामदासी, श्री. सुरेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. देव, देश आणि धर्मसंस्कार यांचे जतन अन् संवर्धन करणार्या युवा पिढी निर्मितीसाठी हे शिबिर मैलाचा दगड ठरल्याने हिंदु जनजागृती समिती ‘श्री समर्थ सेवा मंडळा’प्रती आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली.




