धर्मप्रेमींची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूर – यापूर्वी विशाळगडावर रेहान मलीक याच्या नावावर जो उरूस भरवला जात होता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र होत असे. सद्य:स्थितीत सरकारने विशाळगडावर प्राणीहत्या आणि मद्यप्राशन करणे, यांवर बंदी घातली आहे.
१४ मे या दिवशी प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास अनुमती नाकारली. त्यामुळे २८ ते ३० मे या कालावधीत रेहान मलिक याच्या नावाने होणार्या उरूसाला अनुमती नाकारून तेथील सर्व अवैध अतिक्रमणे भुईसपाट करावीत, अशी मागणी ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या प्रकरणी झालेल्या आंदोलनाच्या प्रसंगी ते बोलत होते.

आंदोलन झाल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.







