
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी राजस्थान राज्यातील जयपूर आणि जोधपूर या भागांचा दौरा केला. या दौर्याच्या वेळी त्यांनी तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेतल्या, तसेच त्यांच्याशी संवाद साधला. या दौर्याचा संक्षिप्त वृत्तांत येथे देत आहोत.
माहेश्वरी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काबरा यांच्याशी संवाद

जोधपूर येथे सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी माहेश्वरी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप काबरा यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांनी समाजाची सद्यःस्थिती आणि त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांविषयी चर्चा केली. या वेळी श्री. संदीप काबरा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आवश्यक ते सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.
‘सारथी फाऊंडेशन’च्या संचालिका लकेश चौधरी यांच्याशी भेट

जयपूर दौर्याच्या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘सारथी फाऊंडेशन’च्या संचालिका लकेश चौधरी यांची भेट घेतली. या वेळी ‘स्वदेशी बीज बँके’चे संचालक श्री. रितेश सिंह उपस्थित होते. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांसह अध्यात्म विषयावर चर्चा झाली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी अभ्यासपूर्ण कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
जयपूर येथे ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान (राजस्थान शाखा)’च्या पदाधिकार्यांशी संवाद
जयपूर (राजस्थान) : आज हिंदू जातींमध्ये विभागलेले आहेत, हे एक खोटे कथानक (नॅरेटिव्ह) असून ते पद्धतशीरपणे आपल्यावर लादले गेले आहे. वास्तविक सध्याची व्यवस्था आणि राजकारणी यांनी हिंदूंमध्ये फूट पाडली आहे. अशा स्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे आपणही अभ्यासपूर्वक राष्ट्ररक्षण आणि हिंदुजागृती यांचे कार्य पुढे नेले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. जयपूर येथे सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान, जयपूर’ आणि ‘महाराष्ट्र मंडळ’ यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने सद्गुरु डॉ. पिंगळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या राज्य समन्वयक विजया पारीक, सहसमन्वयक राघव गर्ग, सुशीला परिहार आणि प्रवीण सिंह राजावत यांच्यासह इतर अन्य प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
महाराष्ट्र मंडळाच्या शिष्टमंडळाशी संवाद

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी जयपूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. या वेळी ‘नवीन पिढीला गौरवशाली हिंदु धर्म आणि सांस्कृतिक वारसा यांच्याशी जोडण्यासाठी कोणत्या प्रकारचे विशेष कार्यक्रम आयोजित करता येतील’, यावर उपस्थितांमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीला महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय कर्णिक, उपाध्यक्ष श्री. नितीन ताटके, कोषाध्यक्ष श्री. मुकुंद सोहोनी आणि कार्यकारी सदस्य श्री. रमेश कुलकर्णी उपस्थित होते.
तरुणांना अध्यात्माची सर्वाधिक आवश्यकता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
जोधपूर येथे मातृशक्तीसाठी चर्चासत्राचे आयोजन
जोधपूर – आजच्या अंधःकारमय कलियुगात केवळ श्रवणभक्ती पुरेशी नाही, तर अध्यात्म जीवनात आचरणात आणले पाहिजे. अध्यात्म हे असे शास्त्र आहे, जे आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत स्थिर अन् आनंदी रहायला शिकवते. अध्यात्म केवळ वृद्धांसाठी आहे, असे अनेकांना वाटते; पण आज अध्यात्माची सर्वाधिक आवश्यकता तरुण मंडळींना आहे. त्यामुळे आपली मुले करिअर करतांना धर्म, अध्यात्म आणि साधना यांच्याशीही जोडले जातील, याकडे महिलांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. जोधपूर येथील ‘आशापूर्णा एन्क्लेव्ह’ येथील मातृशक्तीशी त्यांनी संवाद साधला. या वेळी डॉ. स्वाती मोदी आणि सुमन चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख महिला उपस्थित होत्या.







