Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मध्यप्रदेश येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मध्यप्रदेश रज्याच्या दौऱ्या वेळी भोपाळ, उज्जैन आणि इंदूर येथील हिंदुत्वनिष्ठ अन् मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेतल्या, तसेच तेथील चर्चासत्रांना संबोधित केले. या दौर्‍याचा संक्षिप्त वृत्तांत येथे देत आहोत.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे मातृशक्तीसाठी चर्चासत्राचे आयोजन 

इंदूर (मध्यप्रदेश) – कुंकू लावणे आणि पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करणे यांसारख्या प्रथांमागे आध्यात्मिक शास्त्र आहे. त्यामुळे आजच्या विवेकशील तरुण पिढीला या परंपरांमागील वैज्ञानिक सार समजावून सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले दिव्य धर्म ज्ञान पुढे जात राहील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मातृशक्तीसाठी आयोजित चर्चासत्रात केले. हे चर्चासत्र भाजपच्या शहरमंत्री अधिवक्ता स्वाती काशिद यांनी आयोजित केले हाेते.  यानिमित्त सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला व साप्ताहिक सत्संग आयोजित करण्याचे ठरले.

या चर्चासत्रानंतर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री नाथ संप्रदायाचे प.पू. योगेश्वर सद्गुरु श्री शीलनाथ महाराज यांच्या पवित्र तपोभूमीला भेट दिली आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना केली. या वेळी अधिवक्ता काशिद यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे या तपोभूमीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये सांगितली.

स्थानिक बुद्धीवंत आणि सनदी लेखापाल यांना मार्गदर्शन 

इंदूर – येथील सर्वसंपन्ननगर आणि वंदनानगर येथे बुद्धीवंतांसाठी, तसेच साईनाथ कॉलनी येथे युवा सनदी लेखापाल यांच्यासाठी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु समाजाने स्वतःचे धर्मबळ आणि साधनाबळ वाढवणे आवश्यक आहे. आपापल्या भागातील मंदिरांच्या माध्यमातून धर्म, संस्कृती आणि आध्यात्मिक साधना यांच्याविषयी प्रबोधनात्मक उपक्रम अन् बालसंस्कार वर्ग या माध्यमांतून त्या क्षेत्रातील हिंदु समाज हा धर्म आणि साधनाबळ यांनी संघटित होऊ शकतो. हे लक्षात घेऊन हिंदूंनी आपापल्या क्षेत्रातील मंदिरांच्या माध्यमातून संघटित झाले पाहिजे.’’

या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी मार्गदर्शन करून समर्पक उत्तरे दिली. या वेळी त्यांनी तरुणांना हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे जीवनातील महत्त्व विशद केले, तसेच भारतीय संस्कृती अन् विदेशी संस्कृती यांच्यातील भेद सुस्पष्ट केला.

भोपाळमधील संत हिरदारामनगर येथे राष्ट्र आणि धर्म यांविषयी चर्चासत्रात मार्गदर्शन 

भोपाळ येथील दौर्‍याच्या वेळी  हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी, संत हिरदारामनगर येथील  बैरागड येथे एका चर्चासत्राला संबोधित केले. या वेळी त्यांनी हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आणि धर्मकार्यात साधना बळाचे महत्त्व यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यःस्थितीविषयी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. या चर्चासत्राचे आयोजन ‘भारत विकास परिषदे’चे राज्य समन्वयक कमल प्रेमचंदानी यांनी केले होते. या वेळी बैरागड विभागाचे संघचालक श्री. बसंत चेलानी, ‘संस्कार स्कूल’चे अध्यक्ष श्री. सुशील वासवानी, ‘नवयुवक सभे’चे सचिव श्री. सुरेश राजपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्याशी संवाद !

श्री. सुधीर अग्रवाल यांना हिंदी भाषेतील पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘कालायन-वैदिक घडी उपक्रम संकल्पा’च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. भैय्याजी जोशी यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला. यानिमित्त त्यांनी श्री. जोशी यांना हिंदी भाषेतील ‘धर्मशिक्षा फलक’ ग्रंथ भेट म्हणून दिला.

‘सागर ग्रुप’चे अध्यक्ष सुधीर अग्रवाल यांची सदिच्छा भेट

श्री. सुधीर अग्रवाल यांना हिंदी भाषेतील पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भोपाळ दौर्‍याच्या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘सागर ग्रुप’चे अध्यक्ष श्री. सुधीर अग्रवाल यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांना समितीच्या वतीने युवकांसाठी चालू असलेल्या कार्याची माहिती दिली.

उज्जैन येथील ‘कालायन-वैदिक घडी उद्घोषणा’ कार्यक्रमात सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सहभाग

उज्जैन – येथील महाकाल मंदिराच्या परिसरात ‘कालायन-वैदिक घडी उपक्रम संकल्पा’च्या विधीवत उद्घोषणेचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची विशेष अतिथी म्हणून वंदनीय उपस्थित होती. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य श्री. भैय्याजी जोशी, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वती, सोमयागाचे प्रमुख आचार्य आपटे गुरुजी, महर्षि सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विरूपाक्ष आदी उपस्थित होते. यानिमित्त सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा ‘कालायन परिवारा’च्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. विभास उपाध्याय हेही उपस्थित होते.

पत्रकार राष्ट्र आणि धर्म यांचे ध्वजवाहक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा पत्रकारांशी संवाद

इंदूर – पत्रकार हे राष्ट्र आणि धर्म यांचे ध्वजवाहक आहेत. त्यामुळे भारताच्या संस्कृतीविषयी अधिक प्रचार करणे, तसेच भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रजागृती करणे, हे त्यांचे दायित्व आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘मातृभाषा उन्नयन संस्थान’च्या वतीने आयोजित वार्तालापमध्ये केले. याप्रसंगी इंदूर प्रेस क्लबचे अध्यक्ष दीपक कर्दम आणि ‘मातृभाषा उन्नयन संस्थान’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अर्पण जैन यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना भगवान श्रीरामाचे छायाचित्र भेट देऊन सन्मानित केले.

या बैठकीच्या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी राष्ट्र आणि धर्म , तसेच सामाजिक आव्हाने यांवर सविस्तर चर्चा झाली.या चर्चेच्या वेळी डॉ. पिंगळे यांना ‘साहित्यग्राम’ पुस्तक भेट करण्यात आले. या वेळी प्रेस क्लबच्या कार्यकारिणीचे सदस्य श्री. श्याम कामले, श्री. लक्ष्मीकांत पंडित, श्री. राजेंद्र कोपरगांवकर, डॉ. संतोष पाटीदार, श्री. विजय गुंजाल, श्री. बंटी गुंजाल, अधिवक्ता आकाश यादव, रिया मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि सनातन संस्थेच्या सौ. पुष्पा सावंत आदी उपस्थित होते.

Latest News