Menu Close

‘गोमंतक टीव्ही’वरील चर्चासत्रातील हिंदु जनजागृति समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांचे वक्तव्य मोडतोड करून प्रसारित

खोटेपणा करून अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र न थांबवल्यास अब्रूहानीचा खटला प्रविष्ट (दाखल) करण्याची चेतावणी

पणजी (गोवा) – ‘गोमंतक टीव्ही’वरील ‘सेंट फ्रान्सिस झेव्हिअर’ विषयावरील चर्चेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य प्रवक्ते डॉ. मनोज सोलंकी यांनी मांडलेल्या विचारांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात असून यावर समितीने तिचा अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे. डॉ. सोलंकी यांनी स्पष्ट केले आहे की, ‘हिंदु जनजागृती समिती ही कोणत्याही जातीव्यवस्थेच्या आधारे भाष्य करत नाही. प्रत्यक्षात मी असे काहीही बोललो नाही. माझी आणि समितीची अशी भूमिकाच नाही. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंताने ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्यं गुणकर्मविभागशः ।’ असे म्हटले आहे, त्यानुसार सर्व वर्ण हे गुणकर्मानुसार आहेत. आम्ही जन्मावर आधारित नव्हे, तर वर्णआधारित व्यवस्था धर्मात आहे, असे मानतो. माझ्या मुलाखतीतील ‘गोमंतक’ने पूर्ण व्हिडिओ दाखवावा. माझ्या वाक्याची मोडतोड करून व्हिडिओ दाखवला आहे. खोटेपणा करून चाललेली माझी आणि समितीची अपकीर्ती थांबवा, अन्यथा मी अब्रूहानीचा खटला  प्रविष्ट करणार.’

समितीने म्हणले आहे, ‘‘सामाजिक माध्यमावर संपूर्ण चर्चा न दाखवता केवळ सोयीचा २७ सेकंदांचा तुकडा प्रसारित करून मूळ वक्तव्याचा विपर्यास करणे, हा एक खोडसाळपणा आहे. डॉ. सोलंकी यांनी त्यांच्या वक्तव्यात कुठेही कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही, तर केवळ भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील १३ व्या श्लोकाचा आधार घेऊन वर्णव्यवस्था ही ‘गुण’ आणि ‘कर्म’ यांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले होते. टीका करणार्‍यांना भगवद्गीता हा ग्रंथ अमान्य आहे का ?

डॉ. सोलंकी यांनी त्यांच्या भाष्यात ‘सगळे वर्ण समान आहेत’, असे स्पष्टपणे नमूद केले असून कर्मानेच माणसाचा वर्ण ठरतो, हे सांगताना त्यांनी महर्षी वाल्मीकींचे उदाहरण दिले होते. वाल्मीकिऋषि हे केवळ साधनेच्या जोरावर ऋषि झाले, हा इतिहास मांडलेला असतांना त्याचा विपर्यास करून हिंदु समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

हिंदूंमधील धर्माविषयी असलेल्या अज्ञानाचा लाभ घेऊन अनेक लेखक आणि संशोधक सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नरत आहेत; याच पार्श्वभूमीवर समिती हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.विशेष म्हणजे, ‘गोवा आणि कोकण ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली भूमीच नाही’, अशी अत्यंत चुकीची भूमिका मांडणार्‍या व्यक्तींवर लोकांनी आता किती विश्वास ठेवावा ? हा एक मोठा प्रश्न आहे. चर्चासत्रात इतर वक्त्यांकडून जाणीवपूर्वक ब्राह्मण द्वेष पसरवण्याचा जो प्रयत्न झाला, ती अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. शूद्र वर्णाच्या साधनेविषयी तात्त्विक भूमिका मांडत असतांना, त्याचा विपर्यास करून बहुजन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हिंदु जनजागृती समिती या कृतीचा तीव्र निषेध करत असून केवळ अर्ध्या-कच्च्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता जनतेने सत्य जाणून घ्यावे.’’  यापुढेही अशीच अपकीर्ती चालू राहिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Latest News