Menu Close

गोवा इन्क्विझिशनचा इतिहास सर्वांना कळावा, यासाठी उपाययोजना काढण्याची हिंदू रक्षा महाआघाडीची

‘हात कातरो खांबा’च्या नावात पालट करण्याच्या आवाहनाचे प्रकरण

पणजी (गोवा) – तथाकथित इतिहासकार डेल मिनेझिस याने ‘हात कातरो खांबा’चे ‘पेलोरिन्हो नोवो’, असे नामकरण करण्याचे आवाहन करणारे निवेदन ३० मार्च २०२६ या दिवशी अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याच्या संचालकांना सादर केले आहे. यावर राष्ट्रप्रेमी संघटना हिंदू रक्षा महाआघाडी यांनी परखड शब्दांत खंडण केले आहे. त्याचसमवेत गोवा शासनाकडे इन्क्विझिशनचा इतिहास सर्वांना कळावा, यासाठी काही मागण्याही केल्या आहेत.

हिंदू रक्षा महाआघाडीने म्हटले आहे, ‘‘पोर्तुगीज आणि पाद्री यांनी गोव्यात त्यांचे राज्य बळकट करण्यासाठी २५१ वर्षे तथाकथित ‘होली इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोव्यात केलेल्या आसुरी धर्मच्छळाचा ओल्ड गोवा परिसरात शिल्लक राहिलेला एकमेव साक्षीदार ‘हातकातरो खांब’ हे स्मारक आहे. ते त्या जागेवरून हटवण्याची मागणी परदेशातून स्वतःला इतिहासकार म्हणवणारे डेल मिनेझिस यांनी गोवा सरकारकडे केल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून समजले; परंतु आश्चर्याचा धक्का बसला नाही. त्याचे कारण पोर्तुगिजांनी केलेल्या हिंदूंच्या छळाची निर्देशक अशी एकही खूण गोव्यात शिल्लक राहू नये, याची काळजी घेणारे पोर्तुगीजधार्जिणे लोक गोव्यात आहेत. पोर्तुगीज दयाळू होते, हे दाखवणार्‍या पुस्तकांची निर्मितीही त्यांनी गोव्यात चालू केली आहे. नवा इतिहास लिहिण्याचा हा प्रयत्न चालू आहे.

येथील हिंदू आणि बाटवलेले नवख्रिस्ती यांना धर्माच्या नावाने जिवंत जाळण्यापर्यंत ज्या नरकयातना पोर्तुगीजकाळात चर्चने ‘होली (म्हणजे पवित्र) इन्क्विझिशन’च्या नावाखाली भोगायला लावल्या, ते ‘व्हडले घर’ या नावाने परिचित असलेली, २०० छळकोठड्यांनी युक्त अशी भली मोठी दहशतयुक्त इमारत ‘पालासियु द इन्क्विझिसांव’ ओल्ड गोवामधील चर्चेसच्या परिसरात होती. त्यात पकडलेल्या आणि जिवंत जाळण्याची शिक्षा दिल्या गेलेल्या तथाकथित पाखंड्यांची एक मिरवणूक त्यांना सल्फर रसायन छिडकलेला वेष नेसवून त्यांच्यासाठी खास सिद्ध केलेल्या चितांवर जाळण्यापूर्वी ओल्ड गोव्यातील चर्चच्या परिसरातील रस्त्यांवरूनच ‘आव्तु द फॅ’ या नावाने काढली जायची.

इन्क्विझिशनच्या काळात आपले गोमंतकीय हिंदू आणि नवख्रिस्ती यांच्या पूर्वजांची हाडे, कवट्या आणि सांगाडे हे ज्या ऐतिहासिक ‘वेल ऑफ बोन्स’मध्ये गाडले जायचे, ती हाडांची विहीर ओल्ड गोव्यातील वस्तूसंग्रहालय असलेल्या ‘सॅ कॅथेड्रल’ चर्चच्या समोरच्या उद्यानातील हिरवळीच्या ठिकाणी भूमीखाली आहे. के.के. महंमद हे गोव्याच्या पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे संचालक असतांना त्यांनी या ठिकाणी चालू केलेल्या उत्खननास चर्चने आक्षेप घेतल्याने तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यावर बंदी घातली होती.

मोठमोठ्या चर्चेससह ओल्ड गोव्याचा हा संपूर्ण परिसर गोवामुक्तीनंतर केंद्र सरकारच्या ‘आरक्याओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या (पुराभिलेख सर्वेक्षणाच्या) कह्यात आहे. वर उल्लेख केलेल्या तिन्ही ऐतिहासिक स्थळांचे लिखित पुरावे सरकारपाशी आहेत आणि नामवंत ज्येष्ठ इतिहासतज्ञांचे ढीगभर संदर्भग्रंथ आज उपलब्ध आहेत.’’

हिंदू रक्षा महाआघाडीने गोवा सरकारकडे केलेल्या मागण्या !

१. हातकातरो खांब जनतेला दिसेल अशा इन्क्विझिशन परिसरात (ओल्ड गोवा) सुरक्षित ठिकाणीच असावा; कारण इन्क्विझिशनचा सध्याचा एकमेव साक्षीदार तोच आहे.

२. ‘पॅलेस ऑफ इन्क्विझिशन’च्या ठिकाणी इन्क्विझिशनच्या छळात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक भव्य यथोचित स्मारक उभारावे.

३. कुप्रसिद्ध ‘आव्तु द फॅ’चा रस्ता आरेखित करून त्यावर ‘आव्तु द फॅ’ मिरवणुकीची माहिती देणारे फलक अंतराअंतरावर लावावेत.

४. सॅ कॅथेड्रल समोरच्या हाडांच्या विहिरीच्या ठिकाणी उत्खनन करावे आणि ते ठिकाण स्पष्ट कळण्यासाठी सभोवताली योग्य कुंपण घालून सिमेंटचा टिकाऊ माहितीफलक उभारावा.

गोवा सरकारने गोव्याचा खरा इतिहास पर्यटकांना, तसेच पुढच्या पिढ्यांना कळावा, यासाठी या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे आवाहन करत आहोत.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Latest News