Menu Close

बिहार राज्यस्तराचे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदे लागू करा ! – अधिवेशनातील मागणी

‘हलालमुक्त बिहार अभियान’ अधिक गतीमान करण्याचा हिंदु संघटनांचा निर्धार !

पाटलीपुत्र (बिहार) – ‘भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावे’, या अनुषंगाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ‘भारताच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द काढावा, केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ हे दोन्ही कायदे पारित करावेत, भारतातील सर्व मंदिरांवरील सरकारी नियंत्रण रहित करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत’, अशा हिंदूहिताच्या अनेक ठरावांना या अधिवेशनात संमती  देण्यात आली, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी दिली.

अधिवक्ता संघटनावर भर

‘भारतविरोधी विचारसरणीच्या लोकांच्या षड्यंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रभक्त अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे. त्यामुळे बिहारमधील विविध जिल्ह्यांत अधिवक्ता संमेलन आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. हिंदु संघटनांना आवश्यक कायदेशीर प्रशिक्षण देऊन त्यांना धर्मकार्याकरता सक्षम केले जाईल’, अशी माहिती ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता प्रभाष ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपर्क अभियान

या वेळी श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, बिहारमध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवून ‘हलालमुक्त बिहार’ अभियानाला गती देणे, नव्या हिंदु संघटनांशी संपर्क साधणे, मंदिरांना संघटित करण्यासाठी विश्वस्तांसाठी संपर्क अभियान राबवणे, अशी कार्ये केली जाणार आहेत. येणार्‍या हनुमान जयंतीच्या दिवशी गदापूजन आयोजित करून या अभियानाचा प्रारंभ केला जाईल. बिहारमधील हिंदु राष्ट्र अधिवेशनात अनेक जिल्ह्यांतील हिंदु संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ते, संत, मंदिर विश्वस्त, उद्योगपती, पत्रकार आणि संपादक उपस्थित होते.

हिंदु मंदिरे पाडण्याच्या विरोधात ‘मुझफ्फरपूर मंदिर निर्माण समन्वय समिती’ची स्थापना ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, केंद्रीय अध्यक्ष, आंतराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

सध्या हिंदुत्वाला भेडसावणार्‍या असंख्य आघातांचा सामना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकमेकांशी समन्वय साधून नियमितपणे एकत्र येऊन प्रतिकार केला पाहिजे. मुझफ्फरपूरमधील रेल्वेस्थानकाजवळील प्राचीन मंदिरे पाडण्यात आली, तेव्हा या विध्वंसाचा निषेध करण्यासाठी ‘मुझफ्फरपूर मंदिर निर्माण समन्वय समिती’ची स्थापन करून हिंदु संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सध्याच्या आपत्काळात हिंदूसंघटन अधिक बलशाली करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू संघटित झाल्यामुळेच महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये धर्मांतराविरुद्ध कायदे संमत झाले. अशा प्रकारे केवळ प्रभावी हिंदूसंघटनाच्या माध्यमातूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अधिवेशनांच्या माध्यमातून देशभरातील १ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रितपणे हिंदु राष्ट्राची चळवळ चालवत आहेत. सध्या येऊ घातलेले तिसरे महायुद्ध आणि आपत्काळ यांच्या पार्श्वभूमीवर हिंदूसंघटन अधिक बलशाली करणे आवश्यक आहे.

‘कोर्ट ऑफ वॉर्ड्स कायदा’ अद्यापही बिहारमध्ये लागू ! – पंडित राकेश चंद्र झा, मुख्य पुजारी, श्री दुर्गा मंदिर, बेतिया, बिहार

‘कोर्ट ऑफ वॉर्ड्स कायद्या’नुसार (पालक आणि पाल्य अधिनियम, १८९०) मंदिराचा सर्व निधी सरकारकडे जातो; परंतु पुजार्‍याला वेतन म्हणून केवळ ९०० रुपये मिळतात. हा कायदा देशभरातून रहित करण्यात आला आहे; परंतु बिहारमध्ये तो अजूनही लागू आहे.

भारतविरोधी ‘इकोसिस्टम’ला (यंत्रणेला) तोंड देण्यासाठी राष्ट्रभक्त अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक ! – अधिवक्ता प्रभाष ठाकूर, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती

हिंदूंच्या बाजूने निवाडा देणारे तमिळनाडूचे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी एकत्र आलेले ‘इंडि’ आघाडीचे १०७ खासदार, म्हणजे भारतविरोधी विचारसरणीच्या लोकांची एक ‘इकोसिस्टम’च आहे. त्याला तोंड देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रभक्त अधिवक्ते यांचे संघटन आवश्यक आहे. त्यामुळे बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये अधिवक्त्यांच्या परिषदा आणि चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आवश्यक कायदेशीर साहाय्य देऊन धर्मकार्यासाठी त्यांना सक्षम केले जाईल.

मंदिर रक्षणासाठीचा संघर्ष निरंतर चालूच राहील ! – अनिल कुमार, तिरहुत मंडल प्रभारी, विश्व सनातन सेना, मुझफ्फरपूर

मुझफ्फरपूरमधील रेल्वेस्थानकाजवळील मंदिरे पाडण्यात आली, तेव्हा त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी आम्हाला पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. अखेरीस ‘कोणतीही कारवाई झाली, तर आम्ही आत्मदहन करू’, अशी सरकारला चेतावणी दिली. त्यानंतर आम्हाला याविषयी अनेक प्रलोभने मिळाली; परंतु मंदिरांच्या संरक्षणासाठी आमचा संघर्ष निरंतर चालूच राहील.

हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आचरण अद्वितीय आहे ! – अधिवक्ता राजेश चौबे, पाटलीपुत्र

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक एखाद्या तपस्वीप्रमाणे वैयक्तिक जीवनाचा त्याग करून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहेत. यासमवेतच त्यांचे आचरण आणि आयोजनही अद्वितीय आहे. त्यामुळेच मी या कार्यात सहभागी झालो. समाजाचे नेतृत्व करणार्‍या अनेक हिंदुत्वनिष्ठांना समितीच्या आयोजनांमधून नेहमीच पुष्कळ काही शिकायला मिळते.

डावीकडून ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता प्रभाष ठाकूर, बोलतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी

Latest News