Menu Close

जळगाव (महाराष्ट्र) येथे ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वसंरक्षण आणि स्वावलंबन यांचा प्रेरणादायी संदेश !

व्यासपिठावर डावीकडून सौ. माहेश्वरी सरनोबत आणि मेजर मैत्रेयी दांडेकर

जळगाव (महाराष्ट्र) – हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. मेजर मैत्रेयी दांडेकर आणि ‘आयर्नमॅन’ सौ. माहेश्वरी सरनोबत यांचे अमूल्य मार्गदर्शन सर्वांना लाभले. महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. स्वसंरक्षण आणि स्वावलंबन यांचा प्रेरणादायी संदेश या माध्यमातून देण्यात आला.  प्रमुख वक्त्या मेजर मैत्रेयी दांडेकर यांचा सत्कार सौ. पौर्णिमा जोशी यांनी, तर सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार ‘भरारी फाऊंडेशन’च्या सौ. चित्रा चौधरी यांनी केला.

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक महिलेसाठी अत्यावश्यक ! – मेजर मैत्रेयी दांडेकर        

महिलांनी संकटसमयी धैर्य, आत्मविश्वास आणि तत्परता ठेवणे आवश्यक आहे. सध्याचा प्रतिकूल काळ आणि घडणार्‍या घटना पहाता ‘आपले रक्षण इतरांनी करावे’, अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येक महिलेने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.

ईश्वराला स्मरून कृती केल्यास निश्चित यश मिळेल ! – सौ. माहेश्वरी सरनोबत, आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’

सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार करतांना सौ. चित्रा चौधरी

‘आयर्नमॅन’ स्पर्धेत समुद्रात ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ७२ किलोमीटर धावणे असे अत्यंत कठीण प्रकार एकाच वेळी पार करायचे असतात. अत्यंत प्रतिकूल वातावरणात होणारी ही स्पर्धा मी केवळ नामस्मरण आणि साधना यांच्या बळावरच पूर्ण करू शकले. स्पर्धा पार करण्यासाठी १७ घंट्यांचा कालावधी असतो; पण मी गुरुकृपेच्या बळावर १५ घंट्यांत स्पर्धा पूर्ण केली. सराव करतांना पाण्यात जलदेवतेचे तत्त्व पहाणे, सायकल चालवतांना प्रभु श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण करणे, पळतांना भगवंताशी अनुसंधान साधणे असे केल्याने मला थकवा जाणवत नसे. युवतींनीही प्रत्येक वेळी ईश्वराचे स्मरण करून आणि अनुसंधान ठेवूनच सर्व कृती कराव्यात, तरच त्यांना निश्चित यश मिळेल !

जळगाव येथील रणरागिणींचा विशेष सत्कार ! 

कार्यक्रमात दाखवलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके

वयावर मात करून जिद्दीच्या बळावर ‘सायकलिंग’मध्ये भरीव यश मिळवणार्‍या आणि आतापर्यंत जवळपास ५० सहस्र कि.मी. सायकल चालवणार्‍या जळगाव येथील रणरागिणी कामिनी धांडे यांचा मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यासह १५० मिनिटांत ५०० सूर्यनमस्कार, १०० योगासने आणि ७५ योग मुद्रा करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ करणार्‍या जळगाव येथील रणरागिणी हेतल पिपरिया यांचाही मान्यवर वक्त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा प्रारंभ आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करून अन् श्लोक म्हणून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश गायत्री बारी यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या विशेष फलक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.

उपस्थित मान्यवर

भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नीतू परदेशी, भाजप मिहला मोर्चा उपाध्यक्षा नीला चौधरी, जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, भाजप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या रेखा वर्मा आणि भाजपच्या केतकी पाटील.

Latest News