Menu Close

छत्रपती संभाजीनगर येथे ‘शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरा’चा यशस्वी समारोप !

                                                          प्रशिक्षणात सहभागी युवक-युवती

छत्रपती संभाजीनगर – युवक-युवती यांसाठी आयोजित ‘शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ ४ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयाचे मैदान, सिडको येथे यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिरार्थींनी प्रशिक्षणातील विविध स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. हे शिबिर हिंदु जनजागृती समिती, राष्ट्र धर्म साधना प्रशिक्षण गुरुकुल आणि धर्मयोद्धा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, वीरमाता जिजामाता अन् स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘राष्ट्र धर्म साधना प्रशिक्षण गुरुकुल’चे, तसेच शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक श्री. शरद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

समारोपप्रसंगी उपस्थित ‘भारतीय महिला टूल उत्पादक संघटने’च्या अध्यक्षा सौ. मोहिनी केळकर, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठा’चे माजी सिनेट सदस्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी युवक-युवती यांना शारीरिक, मानसिक आणि आत्मरक्षणाच्या दृष्टीने सक्षम होणे, ही आजच्या काळाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक कु. प्रियांका लोणे यांनी सांगितले की, युवक-युवती यांनी शिस्त, संस्कार, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा अंगीकारावी, तसेच स्वसंरक्षण हे केवळ प्रशिक्षणापुरते न ठेवता नियमित सरावातून जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा.

एकूण ८ दिवसांच्या या शिबिरात १६० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. कडाक्याच्या थंडीतही सकाळ-संध्याकाळ नियमित उपस्थित राहून सर्व १२ वर्ग पूर्ण करणार्‍या शिबिरार्थींना समारोपाच्या प्रसंगी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘या उपक्रमामुळे युवक-युवतींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि समाजाविषयी उत्तरदायित्व वाढले’, असे आयोजकांनी सांगितले. भविष्यातही असे प्रशिक्षण उपक्रम सातत्याने राबवण्याचा मनोदय या वेळी व्यक्त करण्यात आला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिबिराचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.

Latest News