-
तिरुपती मंदिरात लाडूंच्या घोटाळ्यानंतर रेशमी शेल्यांच्या विक्रीमध्येही गैरव्यवहार
-
१० वर्षांत ५४ कोटी रुपये उकळले

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर मंदिराच्या लाडू भेसळीच्या प्रकरणानंतर आता प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या रेशमी शेल्यांच्या विक्रीतील गैरव्यवहार समोर आला आहे. एका ठेकेदाराने शुद्ध मलबरी रेशमी शेल्यांऐवजी १० वर्षे पॉलिस्टरचे शेले पुरवले. पैसे मात्र रेशमी शेल्यांचे घेतले गेले. प्रत्यक्ष बाजारभावाने ३५० रुपयांचा १ शेला तिरुमला तिरुपती देवस्थानम् म्हणजेच टीटीडीला १ सहस्र ३०० रुपयांना विकला गेला. हा प्रकार वर्ष २०१५ ते २०२५ पर्यंत चालू होता. या काळात टीटीडीने संबंधित ठेकेदाराला सुमारे ५४ कोटी रुपये दिले. आता टीटीडी मंडळाने अध्यक्ष बी.आर्. नायडू यांच्या निर्देशानुसार अंतर्गत चौकशी चालू केली आणि त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला.
नायडू यांच्या मते मंदिरात मोठे अर्पणदाते येतात, त्यांना प्रसाद म्हणून रेशमी शेला दिला जातो. तसेच विधींमध्येही रेशमी शेले वापरले जातात. इथेही स्वस्त पॉलिस्टरचा वापर करण्यात आला. घेतलेल्या नमुन्यांची चाचणी २ प्रयोगशाळांना पाठवण्यात आली. दोन्ही अहवालांत शेल्यांचे कापड पॉलिस्टरच असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवाल आल्यानंतर टीटीडी विश्वस्त मंडळाने आस्थापनाचे सर्व चालू कंत्राटे रहित केली असून संपूर्ण प्रकरण राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी सोपवण्यात आले आहे.







