Menu Close

NCERT च्या नवीन पुस्तकात गझनीने केलेल्या हिंसाचारांची माहिती अंतर्भूत !

मंदिरांची लूट, हिंदूंचे धर्मांतर आदींची दिली माहिती !

नवी देहली : एन्.सी.ई.आर्.टी.ने (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने) ७ वी इयत्तेच्या सोशल सायन्सच्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटीज : इंडिया अँड बियाँड’ या पुस्तकात महमूद गझनी याच्या भारतावरील आक्रमणांचा विषय विस्तृतपणे मांडण्यात आला आहे. यापूर्वी पुस्तकात गझनीवर केवळ एक परिच्छेद होता. आता नवीन पुस्तकात ६ पानांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. या पुस्तकात गझनी आणि त्याच्याशी संबंधित कालखंडांबद्दल अधिक तपशीलवार माहिती दिली आहे.

गझनी याने मंदिरे पाडली !

‘एक्सप्लोरिंग सोसायटीज : इंडिया अँड बियाँड’ पुस्तकात लिहिले आहे की, गझनीने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करून लुटमार केली, इस्लाम धर्माचा प्रचार केला आणि मुसलमानेतरांची हत्या केली. पूर्वीच्या जुन्या पुस्तकात याच विषयावर केवळ एक परिच्छेद होता, ज्यात लिहिले होते, ‘राजांनी मोठ मोठी मंदिरे बांधून त्यांची शक्ती आणि संपत्ती यांचे प्रदर्शन केले; परंतु अनेक परदेशी शासकांनी आक्रमण करून संपन्न मंदिरांना लक्ष्य केले. यामध्ये महमूद गझनी सर्वांत प्रमुख होता.’

सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची माहिती समाविष्ट

नवीन पुस्तकात ‘गझनी आक्रमण’ या विषयावर गझनीच्या भारतावरील १७ आक्रमणांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यात मथुरेच्या मंदिरातील लूट, कन्नौजचे मंदिर आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिर यांच्या विध्वंसाच्या माहितीचा समावेश आहे. पुढे असेही म्हटले आहे की, आता जे सोमनाथ मंदिर आहे, ते वर्ष १९५० मध्ये बांधले आहे. त्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले होते.

हूण आणि अरब आक्रमकांचीही माहिती ! – एन्.सी.ई.आर्.टी.

एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक दिनेश सकलानी यांनी सांगितले की, गझनीच्या  पूर्वी ६ व्या ते १० व्या शतकातील साम्राज्ये आणि राज्ये यांवरही एक प्रकरण आहे. यात कन्नौज, काश्मीर, चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव आणि चोळ शासकांचा समावेश आहे, आणि मध्य आशियातून आलेले हूण आणि अरब यांनी केलेल्या आक्रमणांचीही माहिती शेवटी देण्यात आली आहे.

Latest News