
छत्रपती संभाजीनगर – सध्याच्या स्थितीमध्ये महिला आणि युवती यांना अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. महिला सुरक्षा हा प्रश्नही निर्माण झाला आहे. याच हेतूने महिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनावे आणि त्यांच्यामध्ये लढण्याची मानसिकता, तसेच सिद्धता निर्माण व्हावी, या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव (शे.पू) येथे ‘रडायचे नाही लढायचे’ या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात रांजणगाव (शे.पू) या भागातील ८० युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळीराम गायकवाड यांनी सांगितला. ‘हिंदु धर्माची महानता’ या विषयावर सौ. सुवर्णा निकम यांनी मार्गदर्शन केले, तसेच ‘महिलांची सद्यस्थिती आणि स्वतःच्या रक्षणासाठी करावयाची उपाययोजना’ याविषयी सनातन संस्थेच्या कु. चैताली डुबे यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णा गव्हाड आणि श्री. बळीराम गायकवाड यांनी स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी काही कराटेचे प्रकार आणि स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धती शिबिरात शिकवण्यात आल्या. ‘या शिबिराच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन माहिती मिळाली, शिबिराच्या माध्यमातून आत्मविश्वासही वाढला’, असे मनोगत सहभागी युवतींनी व्यक्त केले.







