Menu Close

माझ्याविरुद्ध गंभीर फसवणूक आणि अपकीर्तीचा कट – सुनील घनवट

घनवट यांच्या नावे पंतप्रधान कार्यालयाला करण्यात आलेल्या बनावट तक्रारीच्या विरुद्ध रायपूर येथे पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून सर्वश्री अंकित द्विवेदी, सुबोध राठी, सुनील घनवट, अमित चिमनानी, विशाल ताम्रकार आणि आशिष परेडा

रायपूर (छत्तीसगड) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका गंभीर गुन्हेगारी प्रकाराचा पर्दाफाश करत सांगितले की, त्यांच्या नावाने एक बनावट तक्रारपत्र (पत्र क्रमांक/२०२५/अ-०१८७) २५ एप्रिल २०२५ या दिवशी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आले. या तक्रारीत घनवट यांचे नाव, पद आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश’ नावाचे खोटे ‘लेटरहेड’ वापरून त्यावर ‘श्री. सुनील घनवट, प्रांत संघचालक’ असे लिहिण्यात आले आहे. या माध्यमातून माझ्या नियोजनबद्ध अपकीर्तीचा डाव रचण्यात आला, असे श्री. घनवट यांनी स्वत: येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

या वेळी रामभक्त सेनेचे छत्तीसगड प्रांत संयोजक विक्रम केवलानी, गोरक्षक अंकित द्विवेदी आणि सुबोध राठी, भाजपचे छत्तीसगड प्रदेश माध्यमप्रमुख अमित चिमनानी, आंतरराष्ट्रीय सनातन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विशाल ताम्रकार आणि शिवसेनेचे आशिष परेडा हे व्यासपिठावर उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेले श्री. सुनील घनवट आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

या प्रकरणी श्री. घनवट आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते यांनी रायपूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात याची तक्रारही प्रविष्ट (दाखल) केली. यासंदर्भात घनवट यांनी पुणे येथील अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) कार्यालयातही लेखी तक्रार नोंदवली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

श्री. घनवट यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्यांनी अशी कोणतीही तक्रार पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेली नाही किंवा कुणालाही अशा तक्रारीसाठी नियुक्त केलेले नाही. पत्रातील स्वाक्षरीसुद्धा त्यांची नाही. ही उघड फसवणूक आहे.

श्री. घनवट यांच्या नावे असलेल्या बनावट पत्रात कुणाविरुद्ध तक्रार ?

उपलब्ध माहितीनुसार, या बनावट तक्रारीत छत्तीसगडचे कृषी आणि आदिवासी कल्याण मंत्री रामविचार नेताम, तसेच व्यापारी राकेश अग्रवाल, मनोज अग्रवाल आणि सुनील अग्रवाल यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर या पत्रामध्ये भाजपचीही अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आरोप अतिशयोक्त पद्धतीने मांडण्यात आले आहेत. हे स्पष्टपणे दर्शवते की, या बनावट तक्रारीचा हेतू केवळ श्री. घनवट यांची प्रतिमा मलिन करणे इतकाच नसून ‘राजकीय द्वेषातून एका मोठ्या गटाला लक्ष्य करत अस्थिरता निर्माण करणे’ हा होता.

श्री. घनवट पुढे म्हणाले की,

ही संपूर्ण कृती म्हणजे दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्यासारखे आहे. हे एक भ्याड आणि गुन्हेगारी वृत्तीने प्रेरित कारस्थान आहे, ज्यामुळे माझ्या सामाजिक आणि सार्वजनिक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

हिंदु जनजागृती समिती अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी आणि चरित्रहननाच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध करते अन् संबंधित प्रशासनाकडून अपेक्षा करते की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बनावट तक्रार करणार्‍यांविरुद्ध तात्काळ न्यायालयीन कारवाई करावी.

Related News