मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ?

‘मी राष्ट्राचा आधारस्तंभ घडवत आहे’, असा दृष्टीकोन पालकांनी ठेवणे

पालकांनो, आपण केवळ एका मुलाचे पालक नसून आपण राष्ट्राचे पालक आहोत. आज आपण पहातो की, समाज आणि राष्ट्र यांची स्थिती चांगली नाही. याचे कारण काय, तर आपण पालक या नात्याने राष्ट्राला सुसंस्कारित पिढी देऊ शकलो नाही. प्रत्येक पालकाने राष्ट्राला सुसंस्कारित पिढी दिली, तर राष्ट्राची स्थिती पालटू शकते. प्रत्येक पालकाने ‘मी माझ्या मुलाला घडवतो आहे’, असे न समजता ‘मी राष्ट्र घडवत आहे’, असे समजावे. व्यक्ती घडली की, समाज घडतो आणि समाज घडला की, राष्ट्र घडेल. म्हणून प्रत्येक पालकाने ‘मी राष्ट्राचा आधारस्तंभ घडवत आहे’, असा व्यापक दृष्टीकोन ठेवूनच आपल्या मुलाला शिक्षण द्यायला पाहिजे. आपले ध्येय व्यापक असेल, तर आपल्याला आनंद मिळेल. आपले ध्येय संकुचित असेल, तर ताण येतो. आज पालक म्हणून आपला दृष्टीकोन संकुचित झाला आहे. पर्यायाने आपल्या जीवनातील ताण वाढला. आपण पाल्याकडे ‘तो मोठा होईल, मला आधार देईल आणि अधिक पैसा मिळवेल’, या दृष्टीने पहातो. ‘पाल्याने सुखासीन जीवन जगावे, आम्हाला सुखी करावे, आमचे नाव राखावे आणि आम्हाला सांभाळावे’, असा संकुचित दृष्टीकोन ठेवला, तर पाल्याशी होणारा व्यवहार सहज आणि आनंददायी होत नाही. असे वाटण्याचे कारण आपला अहंकार हेच आहे. माझा पाल्य सुसंस्कारित व्हायला हवा, त्याने राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करायला हवे. तो राष्ट्राभिमानी असायला हवा. तो स्वतःपेक्षा इतरांसाठी जगायला हवा, तो भोगी होण्यापेक्षा त्यागी व्हायला हवा’, असा व्यापक दृष्टीकोन असायला हवा. आज पालकांचा दृष्टीकोन व्यापक नसल्याने स्वार्थी पिढी झाली आहे. ‘त्याग ·आनंद आणि भोग ·दुःख’, या सूत्राची त्यांना कल्पना नाही.

‘त्यागाचा संस्कार हाच जीवनाचा पाया आहे’,
हा दृष्टीकोन मुलांना देणे आवश्यक असणे

परिक्षेत मलाच जास्त गुण (मार्कस्) मिळावेत, मलाच जास्त पैसा मिळावा आणि सर्व मलाच मिळावे’, असा विचार करणारी, स्वार्थाने बरबटलेली आणि केवळ स्वतःचाच विचार करणारी पिढी आज आपण सिद्ध करत आहोत. त्यामुळे आपणाला जागोजागी भ्रष्टाचार दिसत आहे. याचे मूळ आहे स्वार्थ ! त्यात ‘मी, मला आणि माझे’एवढाच विचार असतो. ‘इतरांचा विचार आपण केला पाहिजे’, हे मूल्य जीवनातून जणू हद्दपारच झाले आहे. आपण मुलांना त्याग शिकवायला हवा. स्वतःसाठी कोणीही जगते; पण इतरांसाठी जगण्यातच खरा आनंद आहे. हे पालकांनी स्वतःच्या कृतीतून मुलांना शिकवायला हवे. आपण त्यांना स्वार्थी केल्यामुळे मोठे झाल्यावर ही पिढी स्वतःचा स्वार्थ आणि सुख यांसाठी आपल्याला वृद्धाश्रमात ठेविल. ‘आपण इतरांसाठी जगायला हवे, त्यागाचा संस्कार हाच जीवनाचा पाया आहे’, हा दृष्टीकोन आपण मुलांना पालक या नात्याने द्यायला हवा. व्यापक झालेला जीव स्वतः आनंदी होतो आणि इतरांनाही आनंद देतो.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

Leave a Comment