मुलांना वेळीच संस्कारक्षम करणे आवश्यक !

आषाढ कृष्ण पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११५ (२८.७.२०१३) या दिवशी मी मुंबईत आगगाडीने प्रवास करत होते. त्या वेळी माझ्या समोर २ कुटुंबे बसली होती. दोन्ही कुटुंबात प्रत्येकी एक मुलगा होता. दोन्ही मुलगे आपल्या आई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने ठोसा लगावल्याप्रमाणे हाताची मूठ त्याच्या वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनी दुसर्‍या मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करून गोळी मारल्याप्रमाणे केले. आई-वडिलांपैकी कुणीही त्या मुलांना ओरडले नाही, उलट ते मुलांना हसून प्रतिसाद देत होते.

ही दृश्ये पाहिल्यावर जाणवले की, हा सर्व सध्याच्या चित्रपटांचाच परिणाम आहे. अनेक चित्रपटांतून हिंसक वृत्तीचे प्रदर्शन मांडण्यात येते. मारामारी, एकमेकांच्या हत्या करणे, दंगली आणि जाळपोळ अशी दृश्ये सर्रास दाखवली जातात. त्याचाच परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होतो. त्यामुळे तीही हिंसकतेकडे वाटचाल करू लागतात. पूर्वीच्या काळी मुले आई-वडिलांसमोर केवळ नमस्काराचीच मुद्रा करायची; पण आता वडिलांच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करणे, म्हणजे समाजाची नैतिकता किती रसातळाला जात आहे, हे यातून लक्षात येते. हीच मुले मोठी झाल्यावर खून, मारामारी करणार नाहीत, हे कशावरून ? उद्या याच मुलांनी आई-वडिलांच्या दिशेने खरोखरची बंदूक धरल्यास आश्‍चर्य वाटायला नको. मुलाने आई-वडिलांची हत्या केली, अशी अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रांतून वाचलीही आहेत. अयोग्य कृतींना आई-वडिलांकडून दिल्या जाणार्‍या सकारात्मक प्रतिसादामुळेच आजची पिढी बिघडत चालली आहे.

संस्कार म्हणजे काय, हेच आजच्या मुलांना ठाऊक नाही. आई-वडिलांनीच मुलांना संस्कारक्षम करायला हवे. भावी पिढी सुसंस्कारक्षम घडवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

– सौ. नम्रता दिवेकर, पनवेल.