गर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे ?

१. मूल जन्माला येण्यापूर्वी

गर्भावर चांगले संस्कार कसे करावेत ? : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. संत वाङ्‍‍मय, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता यांपैकी वाचन करावे. संतांची, देवांची, चरित्रे वाचावीत. मनक्षोभ होईल असे वाङ्‍‍मय, रहस्यकथा वाचू नयेत किंवा वाहिन्यांवरील मारामाऱ्या, खून यांसारखी भीती, दु:ख किंवा क्रोध निर्माण करणारी दृश्ये बघू नयेत. गरोदर स्त्रीला ज्या देवतेचे, संतांचे किंवा वीरपुरुषांचे गुण आपल्या मुलात यावे, असे वाटत असेल, त्याची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवून त्यावर ध्यान करावे. ध्यानाच्या शेवटी गर्भवती स्त्री काही आवश्यक सूचनाही देऊ शकते. गर्भवती स्त्रीने नामजप करावा. आईचा आहार, विहार, विचार व इच्छा यांचा गर्भावर परिणाम होतो. गर्भवतीच्या उत्तम आचार-विचारांचा गर्भाच्या मनावर ठसा उमटतो.

२. अनुभव

गरोदरपणी अखंड नामजप केल्याने प्रसुतीच्या वेळी त्रास न होणे व तेजसवरही नामजपाचा संस्कार होणे : तेजस पोटात असतांना गरोदरपणी मला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले होते. मी या काळात आमची कुलदेवी श्री कामाक्षीदेवी हिचा अखंड जप करायचे. त्यामुळेच कु. तेजसच्या जन्माच्या वेळीसुद्धा मला कोणताही त्रास झाला नाही आणि ईश्वराच्या अखंड स्मरणाने त्याच्यावर नामाचा संस्कार झाला. याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. – सौ. शिरोडकर.

३. नामकरण संस्काराविषयीच्या सूचना

धर्मानुसार मुलांना नावे ठेवावीत : आपल्या मुलांना रीटा इत्यादी ख्रिस्ती पंथीय किंवा इतर पंथात असलेली किंवा पिंटू, बंटी इत्यादी अर्थशून्य नावे ठेवण्या ऐवजी नामकरण विधीच्या शास्त्रात सांगितल्यानुसार नावे ठेवल्यास अधिक लाभ होतो. नावाचा परिणाम मानवाचे मन, व्यवहार आणि जीवनावर होतो. म्हणून हिंदू धर्म शास्त्रात कोणत्या प्रकारची नावे ठेवायची,हे सांगण्यात आले आहे. मूल गर्भाशयात असतानाच त्याचे लिंग निर्धारित होते. त्याच प्रकारे मुलाचे नावही आधीच निर्धारित झालेले असते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच घटक कधीही एकत्र असतात. त्यामुळे मुलाच्या रूपानुसार त्याचे नावही असते. ते आम्हाला कळत नाही. पण ते उन्नतांनाच कळते. आम्हाला कोणी उन्नत भेटले नाही तर मुलासाठी योग्य नाव कोणते याविषयी ज्योतिष्यशास्त्रच मार्गदर्शन करू शकते.- कु. गिरीजा

४. मुलांना टोपण नावे ठेवल्याने मुलांचा होणारा गोंधळ

अ. मुलीला शाळेत नोंदवलेले नाव अपरिचित वाटणे : एका मुलीचे टोपणनाव नि उपस्थिती पटावरील नाव वेगळे होते. घरी तिला `नमिता’ म्हणत होते आणि शाळेत तिचे नाव `स्मिता’ नोंदवले होते. उपस्थिती पटावरील नाव तिला समजत नसल्यामुळे ती मुलगी कधीच वर्गात उपस्थिती देऊ शकली नाही. नाव उच्चारल्यावर `ती मी नव्हेच’ असाच तिच्या मुखावरील भाव असे. अनेक वेळा पालकांना या गोष्टीची जाणीव देऊनही त्यात बदल होत नव्हता. ती मुलगी मोठ्या वर्गात गेली, तेव्हा तिला आवड-नावड निर्माण झाल्यामुळे उपस्थिती पटावरचे नाव तिला आवडत नसे. वारंवार ही समस्या आल्यामुळे शेवटी तिच्या पालकांना प्रतिज्ञापत्र करून नाव तिचे नाव बदलावे लागले.

आ. घरी लाडाने पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे नाव घेऊन हाक मारल्याने मुलांचा गोंधळ होणे : काही पालक लाडाने आपल्या पाल्यांची पिंकी, विकी, डॉली, पिंट्या अशी इंग्रजी पद्धतीची टोपणनावे ठेवतात. शाळेत त्या लहान मुलांना त्यांच्या नावाने हाक मारल्यावर त्यांना पटकन कळत नसे आणि ती गोंधळून जात. पालकांना सांगूनही ते त्यात पालट करत नसत. अनेक पालक मुले मोठी झाल्यावरही तशा पद्धतीने हाक मारतात. ती नावे मुलांना उचित वाटत नाहीत, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.’

– एक शिक्षिका

Leave a Comment