लहान मुलांच्या पालकांनो, नेत्र तपासणीच्या सूत्रांकडे गांभीर्याने लक्ष द्या !

१. लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक !

‘माझे यजमान नेत्रतज्ञ आहेत. एकदा मी त्यांच्याशी चिकित्सालयात बोलत होते. तेव्हा एक आई तिच्या १०-११ वर्षांच्या मुलाला हाताला धरून आत घेऊन आली. मुलाने नेहमीपेक्षा पुष्कळ मोठा आणि अतिशय जाड भिंगाचा चष्मा परिधान केला होता; पण तरीही त्याला नीटसे दिसत नव्हते. इतक्या लहान मुलाला जवळजवळ अंधत्व आलेले बघून माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले. याविषयी मी यजमानांसमवेत चर्चा केली. लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांविषयी पालकांमध्ये अद्यापही असलेली अनास्था प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे ‘या विषयावर सर्वांना जागृत करावे’, असे वाटले.

वरील उदाहरणातील मुलगा हा ७ व्या मासात जन्मलेला होता. त्याला १ मास अतीदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णालयातून घरी सोडल्यावर पालकांनी मुलाची वैद्यकीय कागदपत्रे नीट सांभाळून ठेवली नाहीत, तसेच त्याच्या नियमित चाचण्याही केल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या डोळ्यांना ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ हा आजार असल्याचे निदान वेळीच झाले नाही. उपचारांअभावी मुलाची दृष्टी कायमची अधू झाली. आता या मुलाला आयुष्यभर अंधत्वाशी सामना करावा लागणार आहे. अशी प्रकरणे बघून खरेतर मन हेलावून जाते.

२. वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांची नेत्ररोगतज्ञांकडून नियमितपणे पडताळणी करून घ्या !

प्रिमॅच्युरिटी म्हणजे वेळेआधी जन्मलेले बाळ ! अशा बाळांमध्ये होऊ शकणारा एक धोका म्हणजे ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी !’ यामध्ये बाळाच्या डोळ्यांच्या मागील पडद्याला इजा झाल्याने त्याची दृष्टी कमकुवत होते. कधी कधी अंधत्वही येऊ शकते.

स्त्रीची प्रसुती ३१ आठवड्यांपूर्वी झाली असेल किंवा बाळाचे वजन १ सहस्र २५० ग्रॅमहून अल्प असेल, तर हा आजार होण्याची शक्यता वाढते. असे बाळ अतीदक्षता विभागात असतांना त्याला बराच काळ प्राणवायू लागतो. अशा वेळी सतत ऑक्सिजन दिल्याने बाळाच्या डोळ्याच्या मागच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांची अयोग्य रितीने वाढ होते. त्यामुळे हा नाजूक पडदा आणखी नाजूक होतो. या आजाराचे ४ स्तर असतात. वेळेवर निदान झाल्यास तो आटोक्यात रहातो; पण वेळेवर लक्ष न दिल्यास बाळाला भविष्यात अंधत्व येऊ शकते. सगळ्याच लवकर जन्मलेल्या बाळांमध्ये असे होत नाही. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. केवळ आपले बाळ ‘प्रिमॅच्युअर’ असेल, तर नेत्ररोगतज्ञांकडून नियमित पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

हे सर्व वाचून ‘बाळ लवकर जन्मलेले असतांना ‘एन्.आय.सी.यू.’ (अतीदक्षता विभाग) नकोच किंवा ऑक्सिजन नकोच’, असे विचार चुकूनही मनात आणू नका; कारण विज्ञानाने पुष्कळ प्रगतीद्वारे लवकर जन्मलेले बाळ जगवण्याची किमया साध्य केली आहे. आपण त्याचा लाभ करून घ्यायलाच हवा. केवळ आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) सूचनांचे पालन केले, तर जीवन-मरणाचाही फरक पडू शकतो.

३. रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांनी प्रसूतीतज्ञांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावे !

अल्प दिवसांमध्ये होणारी प्रसूती ही बऱ्याच वेळा थांबवता येऊ शकते. याचा धोका अधिक असणाऱ्या स्त्रियांना वेळेवर औषधे देणे, तसेच कधी कधी गर्भपिशवीच्या तोंडाशी टाका घालणे अशा उपायांनी अल्प दिवसांची प्रसूती आपण टाळू शकतो; पण काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक प्रसूतीतज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना घरच्या ज्येष्ठ स्त्रियांचा सल्ला अधिक मोलाचा वाटतो. गर्भवती स्त्रीला सतत इकडून-तिकडे प्रवास करणे यांसह अन्य गोष्टी घरच्यांना अधिक महत्त्वाच्या वाटतात. रुग्णांना विनाकारण प्रवास न करण्यास सांगितल्यावरही काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. कधी कधी लांबच्या गावातून दूरभाष येतो, ‘आमच्या रुग्णाच्या अचानक पोटात दुखत आहे, रक्तस्रावही होत आहे. आता काय करू ?’ अशा वेळी आम्ही काय करणार ? तेथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात. ‘रुग्ण आणि तिचे नशीब !’, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

४. लहान मुलांचा तिरळेपणा आणि त्यासंदर्भात कशी काळजी घ्यावी ?

लहान मुलांच्या डोळ्यांच्या संदर्भात अजून एक ज्वलंत समस्या म्हणजे तिरळेपणा ! काही बाळांमध्ये ही समस्या जन्मतः दिसते, तर काहींमध्ये काही मासांनंतर उद्भवते, तरीही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. ‘लहान बाळे तिरळीच बघतात’, ‘थोडे वय वाढले की सुधारील’, असे अनेक अपसमज आपल्याकडे रूढ आहेत. त्यामुळे लहान मुलांची पुष्कळ हानी होऊ शकते. बाळाची दृष्टी साधारण ६ आठवड्यांपर्यंत स्थिरावते. त्यानंतर कधीही बाळ तिरळे बघत असल्याचे वाटल्यास नेत्रतज्ञांचे मत घ्यावे. डोळ्यांचे स्नायू सुसूत्रपणे काम करत नसतील, तर बाळांमध्ये तिरळेपणा असू शकतो. एका डोळ्याची दृष्टी कमकुवत असेल, तरी तिरळेपणा असू शकतो. क्वचित् जन्मतः मोतीबिंदूही असू शकतो. अशा वेळी समस्यांचे निदान वेळेवर होणे आवश्यक असते; कारण एक डोळा कमकुवत असेल, तर मेंदू त्या डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करून चांगल्या डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांकडे एकाग्र होऊ लागतो. परिणामी अधू डोळा अजूनच अधू होतो आणि वेळेवर उपचार न केल्यास त्या डोळ्याची दृष्टी कायमची अधू होते. एका डोळ्याने व्यवस्थित दिसत असल्याने मूल अल्प दिसत असल्याचे कधीच सांगत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे ही समस्या तशीच रहाते. कायमची अधू दृष्टी टाळायची असेल, तर ६ वर्षांच्या आत त्याचे निदान होऊन उपचार चालू व्हायला हवेत.

५. मुलांना शिशुवर्गात घालण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यांची नेत्रतज्ञांकडून पडताळणी करून घ्या !

त्यामुळे मुलांना शिशुवर्गात घालण्याआधी एकदा तरी नेत्रतज्ञांकडून डोळे नक्की पडताळून घ्यावेत. सध्या काही शाळांमध्ये अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘शाळा उगाचच या चाचण्या करायला लावतात’, ‘अनावश्यक व्यय करायला लावतात’, अशी ओरड केली जाते; पण या चाचण्यांमुळे बऱ्याच वेळा मुलांच्या अशा समस्यांचे वेळेवर निदान होऊ शकते आणि त्यांची दृष्टी वाचू शकते.

आपल्या काळजाच्या तुकड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एवढे तर करायलाच पाहिजे ना ?

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे