दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

सध्या कोरोनाच्या संकटामुळे देशभरात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामाला जाणार्‍या पुरुष-महिलांपासून ते लहान मुले आणि आजी-आजोबांपर्यंत सर्वच कुटुंबीय घरात एकत्र आहेत. काही जणांना आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम करणे) करण्याची सुविधा दिल्याने ते थोडा वेळ कार्यालयीन कामकाजात व्यस्त आहेत. असे असले तरी घरातील बहुतांश सर्वजण काही ठराविक वेळ अथवा घंटे दूरचित्रवाणीवरील मालिका, चित्रपट, बातम्या यांसह अन्य काही कार्यक्रम बघतात. दूरचित्रवाणीमुळे काही प्रमाणात जरी लाभ होत असला, तरी त्याचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याविषयी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाचा लेख येथे देत आहोत.

 

‘‘दूरचित्रवाणी शाप कि वरदान ?’, असा विषय शाळेत निबंध लिहिण्यासाठी असायचा. त्यात आपण दोन्ही बाजूंची सूत्रे अगदी जोरदार पद्धतीने लिहीत असू. दूरचित्रवाणीने अगदी घराघरांमध्ये प्रवेश केला आहे. मनोरंजन आणि माहिती हा त्याचा मुख्य हेतू आहे; परंतु त्या व्यतिरिक्तही त्याचे आपले कुटुंब, आपली मुले आणि आपल्या स्वतःवरही काही घातक परिणाम होत आहेत का ?, हे पडताळण्याची आवश्यकता आहे.

दूरचित्रवाणीमुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीचा व्यक्तीच्या भावना आणि वर्तन यांवर प्रभाव पडतो का ? मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे का ? पालक-मुले सुसंवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीमुळे पालकांचा मुलांसमवेतचा वेळ न्यून झाला आहे का ? मुलांमधील हिंसक प्रवृत्ती वाढली आहे का ? अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मनःशक्ती केंद्राने जवळपास १ सहस्र ५०० पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली. या प्रश्नावलीमध्ये पालकांनी दूरचित्रवाणीच्या अनुषंगाने स्वतःच्या आणि मुलांच्या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. हे पालक म्हणजे ८ ते १४ वयोगटातील मुलांचे पालक. एकूण १ सहस्र ५०० पालकांपैकी ७०० पालकांच्या प्रश्नावलीचे विश्लेषण करण्यात आले; पण या प्राथमिक विश्लेषणातूनही पुष्कळ माहिती पुढे आली. ही प्राथमिक माहिती आणि त्याचे निष्कर्ष पहाणे, हेही रंजक आणि डोळ्यांत अंजन घालणारे असेल. दूरचित्रवाणीने पालक आणि बालमन यांवरही किती अधिराज्य गाजवले आहे, ते पहाण्यासारखे आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे –

१. पालकांनी स्वत:विषयी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

२. पालकांनी मुलांविषयी दिलेली माहिती

३. प्राथमिक निष्कर्ष आणि टिप्पणी

अ. ७१ टक्के मुलांचा २ घंटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ दूरदर्शन (दूरचित्रवाहिन्या) पहाण्यात जातो. त्यापैकी २१ टक्के मुले ३ ते ४ घंटे दूरदर्शन पहातात, ही चिंतेची गोष्ट आहे.

आ. मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यात दूरदर्शनचा सहभाग आहे का ? कारण ८४ टक्के मुले जेवतांना दूरदर्शन पहातात. मुलांचे जेवणाकडे लक्ष नाही, त्यामुळे अधिक खाल्ले जाते का ? मुलांची जाडी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे, याचे कारण हे असू शकते.

इ. अनुमाने ५७ टक्के पालक असे म्हणत आहेत की, त्यांचा मुलांसमवेतचा वेळ न्यून झाला आहे. तसेच ५२ टक्के पालक असे म्हणत आहेत की, दूरदर्शनमुळे त्यांचा मुलांसमवेतचा संवाद न्यून झाला आहे. याचा अर्थ मुले आणि पालक यामधील संबंध न्यून होण्यास, विसंवाद निर्माण होण्यात, तसेच पालकांचा अमूल्य वेळ (क्वालिटी टाईम) मुलांना मिळण्यात दूरदर्शनचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.

ई. मुले अभ्यास करतांना अनुमाने २२ टक्के पालक दूरचित्रवाणी पहातात. या पालकांनी मुले अभ्यास करतांना दूरचित्रवाणी पहाणे सोडल्यास मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या घरात पोषक वातावरण निर्माण होईल.

उ. दूरचित्रवाणीमुळे मुलांची चंचलता वाढली आहे, असे मत ७५ टक्के पालक नोंदवतात. २० टक्के मुले अभ्यास करतांना दूरचित्रवाणी पहातात. तसेच ८५ टक्के मुले दूरचित्रवाणीवर कार्टून बघतात. अशा मुलांचे ना अभ्यासात लक्ष असते ना कोणत्याही कामात (Attention Deficit Order) आणि लक्षपूर्वक कृतीचा अभाव अन् अतीसक्रीयता विकार (Attention Deficit Hyperactivity Disorder) या समस्या वाढत चालल्या आहेत. परिणामी मुले चंचल आणि आक्रमक बनत चालली आहेत. याचे एक कारण ‘दूरचित्रवाणी’ आहे, असा प्राथमिक निष्कर्ष या टक्केवारीवरून निघतो.

ऊ. ६६ टक्के पालक असे म्हणत आहेत की, ‘दूरचित्रवाणीमुळे घरामध्ये मतभेद आणि भांडणे होतात.’ ८५ टक्के पालकांना असे वाटते की, ‘दूरचित्रवाणीमुळे मुलांमध्ये निराशा आणि चिडखोरपणा वाढला आहे. तसेच दूरचित्रवाणीमुळे मुलांमध्ये हट्टीपणा, आक्रमकता आणि अनुकरणप्रियता वाढली आहे’, असे पालक प्रश्नावलीत नोंदवतात. यावरून असे वाटते की, ‘कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्यात, तसेच मुलांमध्ये भावनात्मक आणि वर्तनात्मक पालट होण्यात दूरचित्रवाणीचा मोठा सहभाग आहे.’

ए. ‘विज्ञापनांचा परिणाम मुलांवर होतो अणि त्यामुळे मुले हट्टी बनली आहेत’, असे ४४ टक्के पालक सांगतात.

ऐ. अनुमाने ५० टक्के पालक २ घंटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ दूरचित्रवाणी पहातात आणि तसेच ५७ टक्के पालक दूरचित्रवाणीवरील मालिका पहातात. ५८ टक्के पालक स्वतःविषयी सांगतांना असे म्हणतात की, ‘दूरचित्रवाणीमुळे आमच्यामध्ये भावनात्मक आणि वर्तनात्मक पालट होतो.’ यावरूनच असे दिसते की, स्वतःचे मन, भावना आणि वर्तन यांवर दूरचित्रवाणीचे अधिराज्य चालू आहे.

४. निष्कर्ष

दूरचित्रवाणी मनोरंजन आणि माहिती यांचे महत्त्वाचे साधन निश्चित आहे. जगभरात काय घडते, हे क्षणार्धात दूरचित्रवाणीच्या माध्यमातून समजते; परंतु त्याचा अतिरेक स्वतःचे कौटुंबिक स्वास्थ्य आणि मनोस्वास्थ्य, भावना बिघडवत तर नाहीत ना, याचा निश्चित विचार करायला हवा. दूरचित्रवाणीची टिव टिव आपल्या जीवनात किती चालू ठेवायची ?, हे या प्राथमिक सर्वेक्षणावरून आपणच ठरवावे.

– श्री. मयूर चंदने

(संदर्भ : मनःशक्ती, दिवाळी अंक, २०१४)

Leave a Comment