श्री रामनाथ

खिस्ताब्द १५६६-६७ च्या आसपास पोर्तुगिजांनी वेर्णे, लोटली, मडगाव आदी भागांतील देवळे मोडली. यामध्ये लोटलीचे रामनाथ देवालय नष्ट केले. लोटली येथील गावकर्‍यांना कळून चुकले होते की, आपली प्राणप्रिय दैवते येथे ठेवणे धोक्याचे आहे. रात्रीच्या वेळी त्यांनी सर्व मूर्ती बांदिवडे गावात स्थलांतरीत केल्या. कवळेच्या थोडे पुढे एका डोंगराच्या पायथ्याशी जागा पसंत करून झोपडी उभारून तेथे मूर्तीची तात्पुरती स्थापना केली. काही कालानंतर त्यांनी येथे विस्तीर्ण जागा विकत घेतली. आजचे ‘स्थळ कुटुंबण’ ते हेच. तेथे छोटे देवालय उभारले. बांदोडे येथे असलेल्या आपल्या परमपूज्य दैवतांना लोटलीसारखे पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी जमिनी विकत घेतल्या. या ठिकाणी पाच स्वतंत्र देवळे उभी राहिली.

१६ मार्च १९०५ या दिवशी श्री लक्ष्मीनारायण, श्री रामनाथ, श्री शांतादुर्गा, श्री सिद्धनाथ अन् श्री कामाक्षी या देवताच्या मूर्तींची मोठ्या थाटात प्रतिष्ठापना झाली. श्री गोकर्ण पर्तगाळ मठाधीश श्री मदिंदिराकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या सान्निध्यात हा समारंभ पार पडला.

महाशिवरात्री उत्सव

महाशिवरात्र महोत्सव हा देवस्थानचा मुख्य उत्सव आहे. हा माघ कृष्ण द्वादशीस चालू होऊन फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालतो. या उत्सवात लालखी, पालखी, अश्वविजय रथ अशा निरनिराळ्या वाहनांतून देवतांच्या मिरवणुका निघतात. द्वादशीस रात्री मंगलाचरण होते. सर्व देवांकडे सांगणे होते. मग सूत्रधार अन् इतर मंडळी स्टेजवर येतात. सूत्रधार गणपतीची प्रार्थना करून त्याला आवाहन करतो. मग गणपति आल्यावर त्याची पूजा होते. गणपति आशीर्वाद देऊन निघून जातो. मग शारदा मोरावर बसून नाचत येते आणि तिचा आशीर्वाद मिळाल्यावर मंगलाचरणाचा कार्यक्रम संपतो. द्वादशी ते अमावास्येपर्यंत व्यासपिठासमोरील सज्जावरील मखरात श्री कामाक्षादेवी बसते. त्यानंतर फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या दिवशी नौकाविहार असतो. द्वितीयेला पालखीच्या समर्र्पणप्रीत्यर्थ अन्नसंतर्पण अन् रात्री शेवटचे नाटक असते. या शेवटच्या दोन रात्री सज्जावरील मखरांत श्री रामनाथ बसतो. येथे प्रसादाकरता करमलीच्या पानाचा वापर होतो. एकादशी, अमावास्या, सोमवारी सकाळी आणि देवस्थानचे ठराविक वज्र्य दिवशी प्रसाद होत नाहीत.

– श्री रामनाथ देवस्थान समिती.

Leave a Comment