धनुषकोडी

भारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी ! हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे.


धनुषकोडी येथील गोड पाणी, हे नैसर्गिक आश्‍चर्य !

धनुषकोडीच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागर निळाशार दिसतो, तर उत्तरेला असलेला बंगालचा उपसागर मळकट काळ्या रंगाचा दिसतो. या दोन्ही सागरांमधील अंतर १ कि.मी एवढेही नाही. दोन्ही सागरांचे पाणी खारे आहे. असे असले, तरी धनुषकोडी येथे एक ३ फुटापर्यंत खड्डा खोदला की, त्याला गोड पाणी लागते, हा निर्सगाने केलेला चमत्कारच नाही का ?

धनुषकोडीचा भूगोल


तमिळनाडू राज्याच्या पूर्वकिनार्‍यावर रामेश्‍वरम् हे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्‍वरम्च्या दक्षिण बाजूस ११ कि.मी. अंतरावर धनुषकोडी हे नगर (शहर) आहे. येथून श्रीलंका केवळ १८ मैल (अनुमाने ३० कि.मी.) अंतरावर आहे ! बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या पवित्र संगमावर वसलेले आणि केवळ ५० गज (अनुमाने १५० फूट) रुंद असलेले धनुषकोडी हे वाळूने व्यापलेेले स्थान आहे

रामेश्‍वरम् आणि धनुषकोडी यांचे धार्मिक माहात्म्य !

उत्तरभारतामध्ये जे काशीचे धार्मिक महत्त्व आहे, तेेच महत्त्व दक्षिण भारतात रामेश्‍वरम्ला आहे. रामेश्‍वरम् हे हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेपैकी एक धामही आहे. पुराणादी धर्मग्रंथांनुसार काशीच्या श्री विश्‍वेश्‍वराची यात्रा रामेश्‍वरम्च्या श्री रामेश्‍वराच्या दर्शनाविना पूर्ण होत नाही. काशीची तीर्थयात्रा बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या संगमावर असलेल्या धनुषकोडी येथे स्नान केल्यानंतर आणि त्यानंतर काशीच्या गंगाजलाने रामेश्‍वराला अभिषेक केल्यानंतरच पूर्ण होते.

धनुषकोडीचा इतिहास आणि रामसेतूची प्राचीनता !

रामसेतूच्या अलीकडील भागाला धनुषकोडी ('कोडी' म्हणजे धनुष्याचे टोक) असे म्हणतात; कारण साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या लंकेत (श्रीलंकेत) प्रवेश करण्यासाठी श्रीरामाने त्याच्या 'कोदंड' धनुष्याच्या टोकाने सेतू बांधण्यासाठी हे स्थान निश्‍चित केले. एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते.

रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या रामसेतूची रूंदी आणि लांबी यांचे प्रमाण एकास दहा आहे, असे सविस्तर वर्णन वाल्मीकि रामायणात आहे. प्रत्यक्ष मोजमापन केल्यानंतरही त्यांची रूंदी ३.५ कि.मी एवढी असून लांबी ३५ कि.मी एवढी आहे. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारीने उचललेल्या वाट्याची कथा आणि पाण्यावर तरंगत असणारे तेथील दगड या गोष्टी आम्हा हिंदूंच्या पिढ्यान्पिढ्यांना माहीत आहेत.

धनुषकोडी आणि रामभक्त बिभीषण


रावण महायुद्धापूर्वी धनुषकोडी नगरातच रावणबंधू बिभीषण हा प्रभु रामचंद्रांना शरण आला होता. श्रीलंकेतील युद्धसमाप्तीनंतर प्रभु रामचंद्रांनी याच नगरात बिभीषणाचा श्रीलंकेचा सम्राट म्हणून राज्याभिषेक केला. याच वेळी लंकाधिपती बिभीषण प्रभु रामचंद्रांना म्हणाला, भारतातील शूर आणि पराक्रमी राजे रामसेतूचा उपयोग करून वारंवार श्रीलंकेवर आक्रमणे करतील आणि श्रीलंकेचे स्वातंत्र्य नष्ट करतील. यासाठी प्रभु आपण हा सेतू नष्ट करावा. आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकून कोदंडधारी प्रभु रामचंद्रांनी रामसेतूवर बाण सोडून तो पाण्यात बुडवला. त्यामुळे हा सेतू पाण्याच्या २-३ फूट खाली गेला आहे. आजही रामसेतूवर कोणी उभे राहिल्यास त्याच्या कमरेपर्यंत पाणी असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment