शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले आणि प्रभु श्री रामचंद्रांच्या हस्ते स्थापन झालेले राक्षसभुवन (जिल्हा बीड) येथील श्री शनिमंदिर !

राक्षसभुवन येथील यमी, काल, शनि आणि बृहस्पती यांच्या मूर्ती

१. श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील शनिमंदिर

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. शनि, काल आणि यमी या तिघांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. येथे राहू आणि केतू यांच्या मूर्ती असून शनिमहाराजांच्या बाजूला बृहस्पतीचीही स्वतंत्र मूर्ती आहे.

२. शनिमंदिराचा इतिहास आणि माहात्म्य

मंदिरातील शनिमहाराजांच्या मूर्तीची स्थापना श्री रामचंद्रांच्या हस्ते झाली आहे. त्रेतायुगात ज्या वेळी रामाला साडेसाती होती, त्या वेळी अगस्तीऋषींनी रामाकडून शनिमहाराजांची स्थापना करवली. ‘या ठिकाणी जो भक्त येईल, त्याचे मी रक्षण करीन’, असा शनीचा वर आहे. त्यामुळे याचे नाव ‘रक्षोभुवन’ असून अपभ्रंशाने ‘राक्षसभुवन’ असे झाले आहे. द्वापरयुगात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या ठिकाणी पूजा करण्यास सांगितले. अलीकडच्या काळात शिवाजी महाराज आणि संत नामदेव यांनी या ठिकाणी येऊन पूजा-पाठ केले आहेत.

२ अ. हिरण्यकश्यपूप्रमाणे आपला वध होऊ नये, यासाठी त्याचे नातू वातापि आणि इलवल यांनी घोर तपःसाधना करणे अन् पितृतिथीनिमित्त साधू-संतांना भोजन करवून त्यांचा वध करणे

हिरण्यकश्यपूला प्रल्हाद, राद, अनुराद आणि सुराद हे चार पुत्र होते. त्यांपैकी रादाला वातापि आणि इलवल ही दोन मुले होती. त्यांचे वास्तव्य दंडकारण्यात होते. ‘आपले आजोबा हिरण्यकश्यपू यांनी तपश्‍चर्या केली आणि वर मागून घेतला की, मला दिवसा, रात्री, घरात अन् बाहेर मृत्यू नको. हे वर मागितले असतांना श्री नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला’, याचा त्यांनी मनात राग धरला. आपल्या आजोबांचा जसा वध झालेला आहे, तसा आपला वध होऊ नये; म्हणून त्यांनी आजोबांपेक्षा घोर तपःसाधना केली. गोदावरी तीर्थाटनाला वा तपाला जे साधू-संत यायचेे, त्यांना हे दोघे ‘आमची पितृतिथी आहे. भोजनाला या’, असे सांगून भोजन करवून त्यांचा वध करत असत. असे कित्येक वर्षे चालले.

२ आ. असा केला अगस्तीऋषींनी वातापि आणि इलवल यांचा वध !

मग ऋषीमुनींनी अगस्तींची प्रार्थना केली. तेव्हा ‘अगस्तींनी यांचा वध करणे दुष्कर आहे’, असे सांगून ‘यांचा वध शनिमहाराज करू शकतील’, असे सांगितले. सर्व जण शनिमहाराजांना शरण गेल्यावर महाराज म्हणाले “यांच्या वधाला मी निमित्त होईन. यांचा वध अगस्तींनी करावा.” जोपर्यंत शनिमहाराज त्यांच्या राशीला वक्री ८ वे येत नाहीत, तोपर्यंत त्यांनी वाट पाहिली. शनिमहाराज वक्री ८ वे आल्यावर अगस्ती आले. नियमाप्रमाणे त्यांना निमंत्रण मिळाले. त्याप्रमाणे अगस्ती त्यांच्या आश्रमात गेले. वातापि अन्नरूप झाला आणि इलवलने ब्राह्मण बनून त्यांना निमंत्रण दिले होते. वातापीला ग्रहण करून शनिरूपाचा अग्नि पोटात धारण करून अगस्तींनी त्याचा संहार केला. इलवलने हे पाहिले आणि तो दक्षिणेकडे पळत गेला. त्याने समुद्राचा आश्रय घेतला. अगस्तींनी समुद्राला त्याला स्वाधीन करण्याची विनंती केली; पण समुद्राने नकार दिला. मग अगस्तींनी तीन आचमनांत समुद्र प्राशन करून इलवलला काढून घेतले आणि त्याचा संहार केला. अगस्तींनी लघुशंकेने समुद्र पूर्ववत केला.

अगस्तींनी शनिमहाराजांना विचारले, “त्रेतायुगात आपण वक्री आल्यावर साधना करणार्‍यांची ही अवस्था होते, तर कलियुगात सामान्य माणसाचे काय ?” तेव्हा शनिमहाराजांनी त्यांना वालुकाश्म रूपातील मूर्ती स्थापन करण्याची सूचना केली. ‘जो कुणी माझे या ठिकाणी पूजन करील, त्याचे त्रास मी न्यून करीन.’ असे हे वरदायी ठिकाण आहे.

२ इ. नवग्रह मंडळाची स्थापना आणि कलशोद्भव तीर्थ

भारतात शनिमहाराजांची जी साडेतीन पिठे आहेत, त्यात उज्जैन, नांदगावजवळ नस्तान आणि राक्षसभुवन ही तीन पिठे अन् बीडला अर्धपीठ आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष नवग्रह अवतीर्ण आहेत. तेथे विज्ञान गणेश, नरसिंह आणि दत्त भगवान अवतीर्ण झालेले आहेत. नवग्रह मंडळाची स्थापना असल्याने जन्म-लग्न कुंडलीतील दोष न्यून करता येतात. शनिमहाराजांसमवेत कालाची स्थापना असल्याने कालसर्पशांती, श्राद्धविधी इत्यादी कर्मे केली जातात. शनिमहाराजांची स्थापना करून अगस्ती येथून जाऊ लागले, तेव्हा वातापि आणि इलवल यांनी मारलेले अनेक ऋषी, जे प्रेतरूपात वातावरणात होते, त्यांनी मुक्ती देण्याची अगस्तींना प्रार्थना केली. तेव्हा अगस्तींनी त्या ठिकाणी आत्मतीर्थ स्थापित केले. याचा उल्लेख पुराणात आहे. अगस्तींचा जन्म कुंभात झाला असल्याने कलशोद्भव तीर्थ म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे.

विष्णुपादाची जी १९ ठिकाणे भारतात सांगितली आहेत, त्यात हे तीर्थ असल्याने पितृमुक्तीची सर्व कार्ये गोदावरीच्या काठी केली जातात. दत्तात्रय, विज्ञानेश्‍वर गणेश आणि महादेव यांचे हे स्थान असल्याने आत्ममुक्ती करण्याचे हे पवित्र क्षेत्र आहे.

२ ई. शनि अमावास्या आणि शनिमहाराजांचा जन्मोत्सव

शनि अमावास्येला होणार्‍या पूजेचे या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. या अमावास्येला आंध्रप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक येथून येणार्‍या भाविकांची विशेष उपस्थिती असते. लक्षावधी लोक उपस्थित असतात. पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते दशमी या कालावधीत उत्सव असतो. प्रतिपदेपासून दिवस-रात्र तेलाचा अभिषेक चालू असतो. अष्टमीला सायंकाळी शनिमहाराजांचा जन्मोत्सव असतो. हरिनाम आणि कीर्तन असते. त्याचप्रमाणे जन्मानंतर दुसर्‍या दिवशी महापंगत आणि काला करून उत्सवाची सांगता केली जाते.

३. श्री विठ्ठल सुंदर यांचे समाधीस्थान

निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर हे त्या काळातील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे होते. त्यांची समाधी या ठिकाणी आहे. माधवराव पेशव्यांच्या हातून त्यांची हत्या झाली. ब्रह्महत्या झाल्याने माधवराव पेशव्यांनी त्यांची उत्तरक्रिया करून या ठिकाणी त्यांची समाधी बांधली आहे.

४. सुवर्ण अश्‍वत्थ आणि काळुंकाई

वृत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्राने दधिची ऋषींकडे त्यांच्या अस्थी मागितल्या. त्या अस्थींपासून वज्रास्त्र बनवून इंद्राने वृत्रासुराला मारले. दधिची ऋषींनी इंद्रदेवाला अस्थी देऊन देहत्याग केला, त्या वेळी दधिचींची पत्नी सुव्रचा ही गर्भवती होती. गर्भवती असल्याने तिला सती जाता येत नव्हते. सती जातेवेळी तिने तो पोटातील गर्भ सुवर्ण अश्‍वत्थाच्या (पिंपळाच्या) बुंध्यात काढून ठेवला. त्या पिंपळाच्या खोडात त्या भ्रूणाची वाढ झाली. तेच पुढे पिप्पलाद ऋषी झाले. आता तो वृक्ष नाही; पण स्थान हेच आहे. याज्ञवल्क्यांचे भाचे पिप्पलाद ऋषी. त्यांची वृद्धी या पिंपळबुंध्यात झाली आणि त्यांचे रक्षण कालिकामातेने केले. पिप्पलाद ऋषींचे संगोपन कालिकामातेने केलेले आहे. ते ठिकाण काळुंकाई म्हणून प्रसिद्ध आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment