अमरनाथ


अमरनाथ येथील शिवलिंग

अमरनाथ येथील शिवलिंग


अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रुप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते.

गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत,

पहिला मार्ग – सोनमर्ग – बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.

दुसरा मार्ग – पहेलगाम – चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असुन जास्त खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.

यात्रेच्या मार्गामध्ये भाविकांची सोय चांगली आहे. श्वसनाचा त्रास होत नसलेला कोणीही या यात्रेत सहभागी होउ शकतो. ज्यांना या यात्रेत चालता येत नाही त्याच्यासाठी पालखी, घोडा, खेचर यावरुन वाहून नेण्याची व्यवस्था आहे. रस्त्यामध्ये भाविकांची अनेक ठिकाणी जेवणाची रहाण्याची व्यवस्था केली जाते. बहुतांशी ठिकाणी ही व्यवस्था स्वयंसेवी संस्थांतर्फे होते.

दंतकथा

असे मानले जाते की भगवान शिवशंकरांनी पार्वतीला या जागी अमरत्वाचे रहस्य समजावले होते व ही कथा ऐकवताना दोन कबुतरांनी पण ऐकली ज्यामुळे ही कबुतरे देखील अमर झाली. आजही असे मानतात की या कबुतरांचे दर्शन या गुहे जवळ काही जणांना होते.

यात्रेचा कालावधी

जुलै पहिला आठवडा ते ऑगस्ट शेवटचा आठवडा. साधारणपणे ४५ दिवस, हिंदू तीथींप्रमाणे.

Leave a Comment