श्रेष्ठ ईश्वरभक्ती

नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत 'नारायण नारायण' असा जप करत असतो. देवाचा आपल्याइतका खरा भक्त त्रिखंडात कोणीही नाही. ही गोष्ट भगवान विष्णूला समजली. आपल्या भक्ताला गर्व होऊ नये; म्हणून देव नेहमीच भक्ताची काळजी घेत असतो. नारदाचा गर्व नाहीसा करावयाचा, असे देवाने ठरवले.

एक दिवस नारदमुनी विष्णूकडे गेले असता विष्णूने नारदांना विचारले, ''देवर्षी, तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जाता, तेव्हा तेथे असलेल्या माझ्या भक्तांची भेट घेता का ? तेथे माझा एक खरा भक्त रहातो.'' हे ऐकून नारदमुनी विचारात पडले. त्यांना वाटले, 'आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार ?'

कोण खरा भक्त आहे, हे पहाण्यासाठी नारदमुनींनी विष्णूकडून त्याची सगळी माहिती घेतली आणि ते पृथ्वीवर सांगितलेल्या ठिकाणी आले. विष्णूने सांगितलेला खरा भक्त एक साधा शेतकरी होता. त्यांना आश्चर्य वाटले. नारदमुनी सबंध दिवस तो शेतकरी काय करतो, हे पहात राहिले. सकाळी तो लवकर उठायचा. देवाचे नामस्मरण करायचा. दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री झोपतांना 'देवा, आज तुझ्यामुळे मी माझं काम करू शकलो. तुझ्याच कृपेने आजचा दिवस चांगला गेला. अशीच कृपा माझ्यावर सतत राहू दे', अशी प्रार्थना करून झोपी जायचा. हे पाहून नारदमुनींना तर गंमतच वाटली. हा दिवसातून एकदा नाम घेतो आणि प्रार्थना करतो. मी देवाचे अखंड नाम घेतो, मग हा खरा भक्त कसा ? नारदमुनी पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विचारले, ''देवा, आपण त्याला खरा भक्त कसे म्हणता, हे काही मला समजले नाही.'' त्यावर श्रीविष्णु हसले. ते नारदमुनींना म्हणाले, ''नारदा, तुम्ही एक काम करा. ही तेलाने भरलेली वाटी आहे. ती कैलास पर्वतावर भगवान शंकराला नेऊन द्या.'' नारदांनी ती वाटी घेतली. तेलाचे भांडे काठोकाठ भरलेले असल्याने वाटेत तेल सांडू नये; म्हणून नारदांचे सर्व लक्ष तिकडे लागले. त्यामुळे विष्णूचे नाव घेणे तसेच राहिले. ती वाटी त्यांनी भगवान शंकराला दिली तेव्हा त्यांना हायसे वाटले.

ते परत विष्णूकडे आले. विष्णु म्हणाले, ''काय नारदा वाटी नेऊन दिलीत ? तेल सांडले नाही ना ?'' नारद म्हणाले, ''नाही, तेल न सांडता वाटी दिली.'' यावर विष्णूने विचारले, ''वाटेत किती वेळा माझे नामस्मरण केले ?'' नारद एकदम ओशाळले. ते म्हणाले, ''त्या वाटीकडे लक्ष असल्यामुळे मी नामस्मरण करायचे विसरूनच गेलो.'' त्यावर विष्णु म्हणाले, ''तुम्ही प्रतिदिन सारखेच माझे स्मरण करता; पण मृत्यूलोकी जातांना तुम्हाला माझी आठवण तरी झाली का ? तुम्ही नुसते भांडे नेतांनाही मला विसरलात; पण तो शेतकरी एवढे संसाराचे जंजाळ पाठीशी असतांनाही मला विसरत नाही. मग श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा.'' हे ऐकून नारदला काय ते उमगले.

मुलांनो, संसारात राहून नामस्मरण करत आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे, ही श्रेष्ठ ईश्वरभक्ती होय.

Leave a Comment