राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच !

एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळयातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देते आहे.

ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो.

हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?

तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले.

मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो.

ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळयात घालतो.

मुलांनो, जी गोष्ट देवाचे स्मरण करून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. आपणही प्रत्येक कृती करतांना कुलदेवीचे स्मरण करून आणि प्रार्थना करूनच केली पाहिजे.