श्रेष्ठवीर हनुमान

छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम अन् स्वामी विवेकानंद यांनाही प्रिय असलेला श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !

१. छ. शिवाजी महाराजांचे कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी हातात गदा घेऊन उभ्या असलेल्या महाबली मारुतीची मूर्ती असणे

         ‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.

२. हनुमंताला ‘भक्तीच्या वाटा दाखव’, अशी संत तुकाराम महाराजांनी विनवणी करणे

         संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही एका अभंगात हनुमंताला विनवणी करून म्हणतात,

शरण शरण जी हनुमंता ।

तुज आलों रामदूता ।

काय भक्तीच्या त्या वाटा ।

मज दावाव्या सुभटा ।।

   – तुकाराम गाथा, अभंग ३२८३, ओवी १, २

           म्हणजे ‘अहो मारुतिराया, तुम्ही रामाचे सेवक आहात; म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. (असे दि्ववार सांगतात.) अहो श्रेष्ठवीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या मला दाखवाव्यात.’ ‘सुभटा’, म्हणजे ‘चांगल्या योद्ध्या’, असे म्हणून त्यांना हनुमंताला सन्मानिले आहे.

३. स्वामी विवेकानंद

            स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांना हनुमानाची जीवनगाथा कथन करून त्यांची मने प्रभावित करत असत.

– डॉ. (सौ.) सुमेधा प्रभाकर मराठे (मासिक ‘हितगुज’, अंक ८९, मार्च २०१२)