शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात !

‘शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे.

सद्यस्थिती

सध्याच्या शिक्षकांच्या तक्रारीच खूप असतात.

१. मुले खूप विचित्र वागतात.

२. ती आमचे ऐकत नाहीत.

३. मुले खूप चंचल आहेत.

४. शिक्षकांशी खूप उद्धटपणे वागतात.

५. वर्गात एकमेकांना त्रास देतात.

६. अभ्यास करत नाहीत.

मुलांच्या वर्तनात बदल न होण्याला पूर्णपणे शिक्षणपद्धतीच जबाबदार असणे

वरील सर्व समस्यांचे चिंतन करायला हवे. एवढी वर्षे आपण मुलांना शिकवतो. बहुतेक सर्व शिक्षक प्रामाणिकपणेच शिकवतात, तरी मुलांमध्ये फारसा बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. हे सर्व शिक्षक बंधूंना मान्यच करावे लागेल. यामध्ये मुख्य कारण इंग्रजी शिक्षणपद्धत. ही आमची शिक्षणपद्धत नसून मेकॉलेची शिक्षणपद्धत आहे. यातून हृदयशून्य माणसेच तयार होतात व त्याची विषारी फळे आपल्याला पहायला मिळत आहेत. म्हणजे मुलांच्या वर्तनात बदल न होण्याला पूर्णपणे शिक्षणपद्धतच जबाबदार आहे.

अध्यात्मशात्रानुसार कुलदेवीची उपासना केल्याने वर्तनात बदल होणे

जर शिक्षणपद्धत जबाबदार आहे, तर आपल्यालाच यातून मार्ग काढायला हवा; कारण आपण समाजाचे मार्गदर्शक आहोत. जर समाज दिशाहीन होत असेल, तर त्याला दिशा देणे, हे शिक्षक या नात्याने आपलेच कर्तव्य ठरते. शिक्षकच यातून सुकर मार्ग काढू शकतो. आपण वाचतो की, वाल्याचा वाल्मिकी झाला. शिवाजीरायांनी अल्पवयातच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. त्याचे कारण काय, तर भवानीदेवीची उपासना ! म्हणजे यातून एक मुद्दा लक्षात येतो की, देवाच्या नामस्मरणाने विध्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होतो. हे त्रिवार सत्य आहे. हे सत्य शिक्षकांनी स्वीकारून ते स्वतःत उतरवले, तर नक्कीच पिढी सुसंस्कारित होईल. प्रथम शिक्षकांनीच देवाची उपासना करायला हवी. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करतच असतो; पण त्यापेक्षा अध्यात्मशात्रानुसार आपण आपल्या कुलदेवीची उपासना करावी.

उपासना करून आनंदी झालेला एक शिक्षक अनेक मुलांना आनंद देऊ शकणे

शिक्षकांनी उपासना केल्यावर त्यांच्या वाणीत चैतन्य येईल. आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुले ऐकून लगेच कृतीत आणतील. इथे एक चिंतनाचा मुद्दा लक्षात येतो की, समाजाचे निर्माते म्हणून आपण आपल्या जीवनात उपासनेला किती महत्त्व देतो, यावर हे सर्व अवलंबून आहे. उपासनेच्या, म्हणजे भक्तीच्या बळावर आपण विध्यार्थ्यांत बदल घडवून आणू शकतो. तेव्हा शिक्षकांनी आपली उपासना वाढवावी. यामध्ये दोन फायदे आहेत. कुलदेवीच्या उपासनेने आपण जे दडपणात वावरतो, मानसिक ताणतणावाखाली वावरतो, त्यातून मुक्त होऊ. नकारात्मक विचारांपासून दूर जाऊ, म्हणजेच पर्यायाने आपण आनंदी होऊ. एक आनंदी झालेला शिक्षक अनेक मुलांना आनंद देऊशकतो.

‘सर्व शिक्षक कुलदेवतेचे उपासक होऊन स्वतः आनंदी होवोत. सर्व विध्यार्थ्यांना कुलदेवतेचे उपासक बनवून सद्गुणांची वाढ होवो व येणारी उदयोन्मुख पिढी सुसंस्कारित होऊन ईश्वरी राज्य लवकर येवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल

Leave a Comment