शिक्षकांचे दायित्व !

शिक्षकांकडून त्यांच्या धर्माचे पालन होत नसल्याने
शाळेतून सद्गुणी म्हणून बाहेर पडलेला विद्यार्थी नंतर भ्रष्टाचार करू लागणे !

खरे पहाता शिक्षकाचा धर्म आहे, विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची वृद्धी करून त्यांची जोपासना करणे. कारण एखादा विद्यार्थी शाळेतून सद्गुणी म्हणून बाहेर पडल्यावर त्याचा समाजाला लाभ होईल. समाज आणि राष्ट्र यांना खर्‍या अर्थाने सक्षम आणि गुणांनी युक्त, परिपूर्ण असा नागरिक देणे, हा शिक्षकाचा धर्म आहे. जर आपण चिंतन केले, तर आपल्याकडून सद्गुणी नागरिक घडवले जात नाहीत, हे लक्षात येईल. याचा अर्थ आपण धर्माचे पालन करत नाही. शिक्षक म्हणतात, मुलांना चांगले गुण मिळाले की, आमचे कर्तव्य संपले. पण यामुळे त्यांचे कर्तव्य संपत नाही. गुणांमुळे मुलांना नोकरी आणि पैसा मिळेल; पण ते प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि नीतीमत्तेने समाजाची सेवा करतील, याची शाश्‍वती नाही; म्हणून आज आपल्याला प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचारी अधिकारी पहायला मिळतात. ते निर्लज्जपणे भ्रष्टाचार करतात. आपण समोरच्या व्यक्तीला त्रास देत आहोत, असे त्यांना अजिबात वाटत नाही.

शिक्षकांनी समाजाला सेवक दिल्यासच त्यांच्या धर्माचे पालन होणार असणे !

या स्थितीतून बाहेर पडायचे असेल, तर वाल्याचा जसा वाल्मिकी ऋषी झाला, तसेच अगदी अवखळ आणि दुर्गुणी मूलसुद्धा देवाच्या नामस्मरणाने बदलू शकते, ही ठाम श्रद्धा आपण विकसित करून संस्कारवर्गाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने आपण राष्ट्रकार्य करू, हाच शिक्षकाचा खरा धर्म आणि कर्तव्य आहे. आज आपण समाजाला खरे सेवक द्यायला हवेत. मग ते वैद्य, अभियंता किंवा सरकारी अधिकारी असतील. सर्वच स्तरांवर समाजाला सेवक दिल्यासच आपण आपल्या धर्माचे खरे पालन केले, असे होईल. सर्वांभू्ती एकच परमेश्‍वर नांदतो, ही भावना सर्वांनी दृढ करणे, हाच खरा शिक्षकाचा धर्म आहे. आपण आपल्या धर्माचे पालन केले नाही, तर व्यक्तीचा, पर्यायाने समाज आणि राष्ट्र यांचा, म्हणजेच आपला विनाश आपणच ओढवून घेणार आहोत.

–  श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.